पुणे किंवा मुंबई ते वॉर्सा विमान सेवा सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 02:02 PM2019-09-14T14:02:12+5:302019-09-14T14:12:57+5:30

पोलंडशी असलेले कोल्हापूरचे भावनिक संबंध यापुढील काळात सुध्दा तितक्याच आत्मियतेने जपताना सांस्कृतिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक संबंध देखील वृध्दींगत करण्याचा निर्धार शनिवारी येथे झालेल्या ‘इंडिया - पोलंड बिझनेस मिट’मध्ये करण्यात आला. याकरीता लवकरच कोल्हापूर बिझनेस फोरम स्थापन करुन येथील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Promotion of business relations with Poland, Kolhapur | पुणे किंवा मुंबई ते वॉर्सा विमान सेवा सुरु होणार

पुणे किंवा मुंबई ते वॉर्सा विमान सेवा सुरु होणार

Next
ठळक मुद्देपुणे किंवा मुंबई ते वॉर्सा विमान सेवा सुरु होणारकोल्हापुरातील ‘इंडिया-पोलंड बिझनेस मिट’मध्ये परिषदेत निर्धार

कोल्हापूर : पोलंडशी असलेले कोल्हापूरचे भावनिक संबंध यापुढील काळात सुध्दा तितक्याच आत्मियतेने जपताना सांस्कृतिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक संबंध देखील वृध्दींगत करण्याचा निर्धार शनिवारी येथे झालेल्या ‘इंडिया - पोलंड बिझनेस मिट’मध्ये करण्यात आला. याकरीता लवकरच कोल्हापूर बिझनेस फोरम स्थापन करुन येथील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिल्लीप्रमाणेच पुणे किंवा मुंबई ते वॉर्सा अशी विमान सेवा सुरु होणार आहे.

कोल्हापूर आणि पोलंड यांचे भावनिक संबंध गेल्या ७७ वर्षापासूनचे आहेत. दुसऱ्या महायुध्दात सुमारे पाच हजार पोलंडवासी कोल्हापुरात आश्रयासाठी आले होते. प्रत्येक वर्षी पोलंडवायीय कोल्हापुरात येतात, त्यांच्या पूर्वजांना स्मरण करतात. परंतु या भावनिक संबंधाच्याही पुढे जाऊन सांस्कृतिक, व्यावासायिक, औद्योगिक संबंध कसे दृढ करता येतील या अनुषंगाने चर्चा करण्याकरीता ही बिझनेस मिट आयोजित करण्यात आली होती.

या बिझनेस मिटला पोलंडचे उप परराष्ट मंत्री मर्सिन प्रिझिडॅक्झ, भारतातील राजदूत अ‍ॅडम बराकोवस्की, पोलिश एअरलाईन्सचे प्रमुख राफेल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, खासदार संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पोलंड प्रधानमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, ट्रेडविंगमधील तज्झ तसेच कोल्हापूरच्या उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते.

बिझनेस मिट मध्ये झालेल्या चर्चेचा तपशिल खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांना सांगितला. कोल्हापूर शहराशी असलेल्या भावनिक संबंधाबरोबरच व्यावसायिक, औद्योगिक संबंधही प्रस्थापित करण्यास पोलंड सरकार व तेथील राज्यकर्ते इच्छुक आहे.

या देशाची कनेक्टीव्हीटी चांगली असून दिल्लीप्रमाणेच पुणे किंवा मुंबई ते वॉर्सा अशी विमान सेवा सुरु होणार आहे. चांदी, वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान, औषधे इत्यादी क्षेत्रात पोलंडमध्ये चांगली संधी उपलब्ध असल्याने कोल्हापूर परिसरातील उद्योजकांना त्याचा लाभ उठविता येईल. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

व्यावसायिकदृष्टीने विचार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या बिझनेस मिट मध्ये आम्ही कोणते करार करण्यावर भर दिला नाही, तर परस्पर विश्वास व मार्गदर्शन करण्याकरीता म्हणून ती आयोजित केली, असे सांगून लवकरच बिझनेस फोरम स्थापन केली जाईल, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

‘बिझनेस मिट’मध्ये कोल्हापूरच्या व्यावसायिक क्षमेतेविषयी गिरीष कुलकर्णी यांनी प्रेझेंटेशन दिले. तर भारतातील राजदूत अ‍ॅडम बराकोवस्की यांनी पोलंडमधील संधीबाबतचे प्रेझेंटेशन दिले. गौतम गाठी यांनी आभार मानले.

बिझिनेस मीटसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

कोल्हापूर येथे आयोजित इंडो पोलंड बिझिनेस मीट साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी कोल्हापूर आणि पोलंडमधील भावनिक नाते अधिक दृढ करण्यासाठी  महाराष्ट्र शासन प्रोत्साहन देईल असे या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या वतीने उपस्थित राहून  सांगितले.  यापुढील काळात उद्योगधंद्यांची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणावर करता येईल, असे भूषण गगराणी यांनी यावेळी सांगितले. तर अन्न प्रक्रिया, चामडे, वस्त्रोद्योग, पर्यटन तसेच शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुक वाढविण्याचा पोलंडचा मनोदय उप परराष्ट्रमंत्री मर्सिन प्रिझिडॅक्झ यांनी व्यक्त केला.

 

 

Web Title: Promotion of business relations with Poland, Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.