गडहिंग्लजमध्ये प्रशासकीय इमारत तातडीने बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:30+5:302021-03-16T04:24:30+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील नियोजित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री ...
गडहिंग्लज :
गडहिंग्लज शहरातील नियोजित मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शहरातील ‘सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली’ याव्यात यासाठी गडहिंग्लज शहर विकास आराखड्यामध्ये आजरा रोडवरील कृषी वैद्यकिय दवाखान्याच्या पूर्वबाजूची जागा आरक्षित करण्यात आली आहे. परंतु, अनेक वर्षांपासून हे काम रेंगाळले आहे.
गडहिंग्लज शहर हे उपजिल्हा दर्जाचे शहर असून याठिकाणी सर्व शासकीय खात्यांचे विभागीय कार्यालये आहेत. बहुतेक सर्व कार्यालये ठिकठिकाणी भाडोत्री जागेत आहेत. त्यामुळे लोकांना कामासाठी शहरभर फिरावे लागत असल्याने वेळेचा व पैशांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे मंजूर जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात, डॉ. एम. एस. बेळगुद्री, प्रा. सुनील शिंत्रे, किरण कदम, नागेश चौगुले, अमर चव्हाण, राजेंद्र तारळे, दिलीप माने, बाळासाहेब गुरव, बसवराज आजरी, गुंड्या पाटील, चंद्रकांत सावंत, अशोक खोत, काशीनाथ गडकरी, उत्तम देसाई, युवराज बरगे आदींचा समावेश होता.
----------------------------------------
* 'मुद्रांक'ला बांधकाम परवाना नको..!
गडहिंग्लज : गडहिंग्लज येथील मुद्रांक व दस्तनोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र निधी मिळवून इमारत बांधकामाची तयारी सुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या हेतूला बाधा येऊन नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे 'मुद्रांक'च्या इमारतीला बांधकाम परवाना देऊ नये, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
----------------------------------------