घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:03+5:302021-07-26T04:24:03+5:30
म्हाकवे : ज्या-ज्या घरात पुराचे पाणी शिरले त्या सर्व पूरग्रस्तांच्या घरांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने ...
म्हाकवे : ज्या-ज्या घरात पुराचे पाणी शिरले त्या सर्व पूरग्रस्तांच्या घरांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले. एकही नुकसानग्रस्त कुंटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या आणि पंचनामे काटेकोर व पारदर्शी होण्यावर भर देऊन लाभार्थीच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.
बानगे (ता. कागल) येथील पूरपरिस्थितीची मंत्री मुश्रीफ यांनी पाहणी केली. यावेळी विस्थापित २२५ कुटुंबांना हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने अन्नधान्याचे वाटप झाले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, डॉ. अभिजित शिंदे, तलाठी सुप्रिया भांगे, ग्रामसेवक पी. के. पाटील उपस्थित होते. मुश्रीफ यांनी भोपळे गल्ली, इंगवले गल्ली, आंबी गल्ली, चावडी गल्ली, सावंत गल्ली, सुतार गल्ली, चावरेकर कोपरा येथील पूरग्रस्तांना भेटी दिल्या.
चौकट : रात गयी, बात गयी असे होऊ नये
पाटबंधारे, महसूल स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रत्येक गावातील पूररेषा निश्चित करून पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन कसे करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पूर निघून गेला की पुढील पुरापर्यंत सर्वच शांत असते. ‘रात गयी बात गयी’ असे व्हायला नको. याचा सर्वांनीच आवर्जून पाठपुरावा करावा आणि कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
२५ बानगे मुश्रीफ पाहणी
बानगे येथे महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या पडझडीची पाहणी करताना मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, रवींद्र पाटील, विलास पाटील, रमेश सावंत उपस्थित होते.