आक्षेपार्ह मजकूर, त्रुटी असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:25+5:302021-03-06T04:24:25+5:30
कोल्हापूर : फडके बुक हाउसने प्रकाशित केलेल्या इतिहास अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि त्याबाबतच्या असलेल्या त्रुटी या ...
कोल्हापूर : फडके बुक हाउसने प्रकाशित केलेल्या इतिहास अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि त्याबाबतच्या असलेल्या त्रुटी या अक्षम्य आहेत. ही सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. त्यामध्ये दुरुस्ती करावी, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी फडके बुक हाउस या प्रकाशनाच्या व्यवस्थापनाला शुक्रवारी केली. शिवाजी विद्यापीठाने या प्रकाशनावर फौजदारी कारवाई करून त्यांच्यावर कायमची बंदी घालावी. अन्यथा दि. १६ मार्च रोजी विद्यापीठाच्या इमारतीसमोर या प्रकाशनाच्या पुस्तकांची होळी करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.
या प्रकाशनाच्या व्यवस्थापकांनी शुक्रवारी माझी भेट घेतली. त्यांनी माफीनामा दिला. मात्र, त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामधील त्रुटी अक्षम्य आहेत. विद्यार्थ्यांसमोर चुकीचा इतिहास, गोष्टी जाता कामा नयेत. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर आणि त्रुटी असलेली सर्व पुस्तके तत्काळ मागे घ्यावीत. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांना दाखवून या पुस्तकामधील त्रुटी तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात. अन्यथा कडक कारवाईची पावले उचलली जातील, अशी समज या प्रकाशनाच्या व्यवस्थापकांना दिली असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाशनाने या पुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक मराठ्यांचा इतिहास खुजा करण्याचा प्रयत्न केला आहे. जाणीवपूर्वक अत्यंत मोठे षडयंत्र रचून इतिहास ऊर्जाहीन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा वापर केला आहे. विद्यापीठाने या प्रकाशनाविरोधात सुरू केलेली कारवाई पुरेशी नाही. त्यासाठी या प्रकाशनावर कायमची बंदी घालावी, या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. शिर्के यांना दिले. कुलगुरूंच्या वतीने हे निवेदन उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी स्वीकारले. या शिष्टमंडळात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, अभिजित भोसले, नीलेश सुतार, उमेश जाधव, सचिन गुरव यांचा समावेश होता.
चौकट
काटेकोर काळजी घेतली जाईल
या पुस्तकामध्ये गैरशब्दाचा झालेला वापर हा जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा नव्हता. त्यामागे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमानाचा हेतू नव्हता. केवळ अनवधानाने घडलेला प्रकार होता. हा प्रकार निदर्शनास आणल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे मनापासून आभार मानतो. आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा अशी चूक घडू नये यासाठी काटेकोरपणे काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही फडके प्रकाशनच्या मंदार फडके यांनी दिली.