मुगळी येथे मिळतोय घरपोच दाखला
By admin | Published: February 3, 2015 12:21 AM2015-02-03T00:21:26+5:302015-02-03T00:27:44+5:30
ग्रामपंचायतीचा उपक्रम : १९ प्रकारचे दाखले मिळणार घरपोच, दोन दाखले मिळणार मोफत
राम मगदूम- गडहिंग्लज -एखाद्या कार्यालयातून कोणताही दाखला मिळविण्यासाठी १७ हेलपाटे मारावे लागतात. मात्र, गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी ग्रामपंचायतीने या पारंपरिक पद्धतीला छेद दिला आहे. ग्रामपंचायतीकडून दिले जाणारे सर्व दाखले ‘आॅनलाईन’ केले आहेत. मागणीनंतर अवघ्या तीन दिवसांत १९ प्रकारचे दाखले नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. घरपोच दाखले देण्याची योजना राबविणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.मुगळी गावची लोकसंख्या २७६८ असून, गावात एकूण ६४७ उंबरे आहेत. राजकारणाबरोबरच समाजकारणातही गाव नेहमी अगे्रसर राहिले आहे. येथील सहकारी संस्थांचे कामकाजही अन्य संस्थांना मार्गदर्शक ठरले असून, ग्रामपंचायतीनेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे.कोणत्याही दाखल्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायतीकडे येरझाऱ्या माराव्या लागू नयेत, अशी व्यवस्था करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत झाला होता. त्यातूनच घरपोच दाखले देण्याची संकल्पना पुढे आली. सरपंच गीता वसंत शिंगे, सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणीही आता सुरू झाली आहे.गटविकास अधिकारी चंचल पाटील, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे, विस्तार अधिकारी आर. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक विठ्ठल कुंभार यांनी ‘घरपोच’ दाखल्यांचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
घरपोचसाठी नाममात्र शुल्क
जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी, वीजकनेक्शन ना-हरकत, घरठाण उतारा, रहिवासी, वर्तणूक, आदी दाखल्यांसह विविध कामांसाठी लागणारे ना-हरकत दाखले, असे एकूण १९ प्रकारचे दाखले मुगळी ग्रामपंचायतीकडून घरपोच दिले जात आहेत. त्यासाठी नाममात्र २० रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा दाखला व हयातीचा दाखला मोफत दिला जात आहे.
घरपोच दाखला
मिळण्यासाठी अट
ग्रामपंचायतीने घरपोच दाखला देण्याची सोय केली आहे. त्यासाठी दाखल्याची मागणी करताना अर्जदार हा ग्रामपंचायतीचा थकबाकीदार असू नये. दाखला मागणी करण्यापूर्वी त्याने घरफाळा व पाणीपट्टी भरलेली असली पाहिजे, ही अट आहे.