प्रचार तोफा आज थंडावणार
By admin | Published: March 25, 2016 12:35 AM2016-03-25T00:35:50+5:302016-03-25T00:38:59+5:30
रविवारी ९८ केंद्रांवर मतदान : चंद्रकांतदादा, मुश्रीफ, सतेज यांच्या आज सभा--गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक
गडहिंग्लज : हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता आज, शुक्रवारी होत आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा शुक्रवारी रात्री थंडावतील. रविवारी (दि. २७) सकाळी ७ ते सायंकाळी
५ यावेळेत ९८ केंद्रांवर मतदान होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भू-संपादन) संजय पवार, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार हनुमंत पाटील, सहायक निबंधक ए. एच. भंडारी व धनंजय पाटील हे काम पाहत आहेत.
आज, शुक्रवारी सायंकाळी
६ वाजता येथील लक्ष्मी चौकात मुश्रीफ-शिंदे-कुपेकर आघाडीची जाहीर सभा होत आहे. सभेत आ. मुश्रीफ व आ. सतेज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. शहापूरकर व प्रकाश चव्हण यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या प्रचारार्थ म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या सभेत सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे दोन्ही सभांकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सतेज पाटील आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे आणि संग्रामसिंह नलवडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास आघाडी आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर व विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, हत्तरकी गट आणि भाजप-सेना युतीचे काळभैरी शेतकरी पॅनेल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पॅनेल यांच्यात तिरंगी सामना होत आहे.
मंगळवारी (दि. २९) सकाळी ८ वाजता येथील गांधीनगरमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)