Maharashtra Vidhan Sabha 2019 : कुटुंबीयांच्या हातात प्रचाराची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:08 PM2019-10-09T12:08:45+5:302019-10-09T12:13:30+5:30
उमेदवारीची अधिकृत माळ अजून गळ्यात पडली नसली तरी ‘भावी आमदार’ समजून इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबीयांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदारसंघांत दिसत आहे.
नसिम सनदी
कोल्हापूर : उमेदवारीची अधिकृत माळ अजून गळ्यात पडली नसली तरी ‘भावी आमदार’ समजून इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबीयांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदारसंघांत दिसत आहे.
कुटुंबातील प्रत्येक सदस्य जबाबदाऱ्याही वाटून घेत गावोगावी जाऊन प्रचाराची राळ उडवत आहेत. त्यात कागलमधून मुश्रीफ, घाटगे, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून पाटील, महाडिक, ‘कोल्हापूर उत्तर’मधून क्षीरसागर, करवीरमधून नरके, पाटील, इचलकरंजीतून आवाडे या घराण्यांतील कुटुंबीयांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. सगळीकडेच उमेदवाराला जाणे शक्य होत नाही तिथे कुटुंबातील सदस्य लोकांना भेटून प्रचाराची भरपाई करत आहेत.
आधी निवडणुका म्हटल्या की कुटुंबीयांनी घर सांभाळायचे आणि विश्वासातील कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळायची, असे समीकरणच होते; पण कालौघात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाही. मतदानासाठी देवघेवीचे व्यवहार वाढल्यापासून जवळच्या कार्यकर्त्यांकडून विश्वासघात होण्याच्या अनेक घटना राजकीय पटलावर गाजल्या.
हा धडा समजून प्रत्येक उमेदवाराने आपापले कुटुंब हा हुकमी एक्का बाहेर काढण्याचे ठरविले. साधारणपणे सन २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून या बदलाला सुरुवात झाल्याचे दिसते. खासकरून ज्या राजकीय घरातील महिला हळदी-कुंकू आणि एखाद-दुसरी प्रचाराची फेरी वगळता कधी बाहेर पडायच्या नाहीत, त्यादेखील सक्रियपणे प्रचारात उतरल्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या घरातील महिला थेट व्यासपीठावरच दिसल्या. एकूण मतदानाच्या ५० टक्के महिला मतदार असल्याने त्यांना आपलेसे करण्याची जबाबदारी या महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यात आई, पत्नी, सून, मुलगी, भावजय, वहिनी या नात्यांनी अनेकजणींनी प्रचारात उडी घेतली आहे.
घरच्या महिलांनी पदर खोचून प्रचार रिंगणात उतरल्यानंतर उमेदवाराच्या घरातील वडील, भाऊ, मुले, पुतणे, चुलते यांनीही प्रचाराची मुख्य धुरा हातात घेतली आहे. आर्थिक व्यवहारापासून ते उमेदवारांच्या आरोग्याची देखभाल करण्यापर्यंतची पडद्यामागील सर्व जबाबदारी यांच्यावर आहे. पडद्यासमोर आणि पडद्यामागील अशा दोन्ही यंत्रणा रात्रं-दिवस राबविण्यासाठी हे सर्व कुटुंबीय राबत आहेत. त्यांना विश्वासातील कार्यकर्त्यांचीही मदत होत आहे.
उमेदवारांसाठी राबणारे कुटुंबीय
- कोल्हापूर उत्तर
आमदार राजेश क्षीरसागर- पत्नी वैशाली, मुलगा ऋतुराज व पुष्कराज
चंद्रकांत जाधव - पत्नी जयश्री जाधव, भाऊ संभाजी जाधव
-------------------------------------
- कोल्हापूर दक्षिण
आमदार अमल महाडिक - पत्नी शौमिका, चुलतबंधू धनंजय महाडिक, भावजय अरुंधती महाडिक
ऋतुराज पाटील - वडील संजय पाटील, चुलते सतेज पाटील, चुलती प्रतिमा पाटील
----------------------------------------
- कागल
आमदार हसन मुश्रीफ - पत्नी सायरा, मुलगा, नविद, आबिद, साजिद, सुना अमरिन, नबिला
समरजित घाटगे- पत्नी नवोदिता, आई सुहासिनीदेवी, चुलते प्रवीणसिंह, चुलतभाऊ वीरेंद्र
------------------------------------
- करवीर
आमदार चंद्रदीप नरके - चुलते अरुण नरके, भाऊ अजित नरके
पी. एन. पाटील - मुलगा राहुल व राजेश पाटील
------------------------------------
- इचलकरंजी
प्रकाश आवाडे- वडील कल्लाप्पाण्णा, मुलगा राहुल, पत्नी किशोरी आणि सुना
-------------------------------------
- राधानगरी
आमदार प्रकाश आबिटकर - बंधू अर्जुन आबिटकर, भावजय रोहिणी आबिटकर
राहुल देसाई - वडील बजरंग देसाई, पत्नी रेश्मा देसाई, बंधू धैर्यशील देसाई
-------------------------------------------
- शाहूवाडी :
विनय कोरे : पत्नी शुभलक्ष्मी कोरे, भाऊ निपुण कोरे, पुतणे विश्वेश कोरे, भावजय नेहा कोरे
आमदार सत्यजित पाटील : वडील बाबासाहेब पाटील, भाऊ राहुल पाटील.
------------------------------------
- हातकणंगले :
राजूबाबा आवळे : वडील जयवंतराव आवळे, भाऊ संजय आवळे
आमदार सुजित मिणचेकर : पत्नी लेखा मिणचेकर, दोन भाऊ