योग्य नियोजनामुळे रुग्णवाहिका भटकंती टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:06+5:302021-04-29T04:18:06+5:30

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची मर्यादित संख्या, महापालिकेच्या वॉर रूममधून मिळणारी उपयुक्त माहिती, बेड्‌सची सहज उपलब्धता यामुळे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ...

Proper planning prevented ambulance wandering | योग्य नियोजनामुळे रुग्णवाहिका भटकंती टळली

योग्य नियोजनामुळे रुग्णवाहिका भटकंती टळली

Next

कोल्हापूर : कोरोना रुग्णांची मर्यादित संख्या, महापालिकेच्या वॉर रूममधून मिळणारी उपयुक्त माहिती, बेड्‌सची सहज उपलब्धता यामुळे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात सध्या तरी रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकांची होणारी भटकंती टळली आहे. दुखणं अंगावर काढल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली, तरच ऐनवेळी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होते. गेल्या महिन्याभरात अशा कमी घटना घडल्या आहेत.

गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यात कोल्हापूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रुग्णवाहिका चालकांचे खूप मोठे हाल झाले. एकीकडे रुग्णांची प्रकृती खालावत असायची, व्हेंटिलेटरची गरज लागायची, बेड कुठेच शिल्लक नसायचे. त्यामुळे रुग्णाबरोबरच नातेवाईकांची धावपळ उडायची. रुग्णवाहिका एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धडकायच्या. रात्रीच्या वेळी केवळ सायरनचा आवाज ऐकून धडकी भरायची. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.

परंतु यावर्षी मात्र इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरी सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आणि त्यांचे गृह विलगीकरण होत असल्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन यांनी वॉर रूम सुरू केल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालय व तेथील बेडची उपलब्धता याबाबत योग्य माहिती मिळत आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला की, त्याला कोणत्या रुग्णालयात न्यायचे हे आधीच ठरते. रुग्णालयाशी चर्चा होते. मगच रुग्णाला उपचारासाठी दाखल केले जाते. आधीच सर्व नियोजन होत असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची बेड मिळवण्यासाठीची धावपळ कमी झाली आहे. बेडच्या शोधात रुग्णवाहिका दारोदारी फिरत नाहीत.

चार तास रुग्ण रुग्णवाहिकेत

तीन-चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. रुईकर कॉलनीतील एकाची घरातच असताना प्रकृती बिघडली. बेडची माहिती न घेताच रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला. पण व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. चार तासांच्या प्रयत्नानंतर रुग्णाला बेलबागेतील खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.

पंढरपूरहून रुग्णाला आणले

एक महिन्यापूर्वी पंढरपूरहून आणलेल्या एका रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना कोल्हापुरात बेड न मिळण्याचा अनुभव आला. तीन-चार रुग्णालयांत फिरून शेवटी मुरगूड येथे त्या रुग्णाला ॲडमिट करावे लागले.

पाॅईंटर -

- कोविडवर उपचार करणारी कोल्हापुरातील रुग्णालये - ६३

- या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेड्‌सची संख्या - १७६१

- बुधवारपर्यंत ॲडमिट असलेल्या रुग्णांची संख्या - १३१८

- उपलब्ध असलेल्या बेड्‌सची संख्या - ४३३

कोट -

१ . गतवर्षी दिवसभरात रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिकांना धावपळ करावी लागत होती. आजची परिस्थिती चांगली आहे. नातेवाईक आधी बेडची, रुग्णालयाची माहिती घेतात आणि मग आम्हाला फोन करतात. बेड सुध्दा उपलब्ध आहेत.

- संग्राम घोरपडे, रुग्णवाहिका चालक

२. महापालिका, जिल्हा प्रशासनाने बेडच्या उपलब्धतेविषयी माहिती देण्याची सोय केल्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा रुग्णांना बेड मिळतात, धावपळ करावी लागत नाही. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाच्याबाबतीतच धावपळ होते.

- गणेश पाटील, रुग्णवाहिका चालक.

Web Title: Proper planning prevented ambulance wandering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.