शहरातील सर्व मिळकतधारकांना प्रॉपर्टीकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:19 AM2020-12-27T04:19:05+5:302020-12-27T04:19:05+5:30
कोल्हापूर : हक्काचे घर नावावर नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बँका कर्ज देत नाही, यासाठी प्रॉपर्टीकार्डचा विषय ...
कोल्हापूर : हक्काचे घर नावावर नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बँका कर्ज देत नाही, यासाठी प्रॉपर्टीकार्डचा विषय कायमस्वरूपी सोडवणे हे ध्येय असेल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेेचे काम लवकरच पूर्ण होणार असून शहरवासीय पुढील दिवाळीची अंघोळ दूधगंगेच्या पाण्याने करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ३१ बाजार गेट येथील विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. माजी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, थेट पाईपलाईन योजना मंजूर केली नाही, तर आमदारकीची निवडणूक लढविणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार योजनेसाठी ४५० कोटींचा निधी आणला. काम अंतिम टप्प्यात आहे. केवळ १० टक्केच काम बाकी आहे. दिवाळीमध्ये थेट पाईपलाईनचे पाणी मिळेल. शुद्ध पाण्यामुळे ९० टक्के रोगराईही कमी होणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर आपले ध्येय शहरातील जे मिळकतधारक प्रॉपर्टीकार्डपासून वंचित आहेत, ते त्यांना देणे असेल. हक्काचे घर आहे त्यांना प्रॉपर्टीकार्ड देण्यातील अडचणी दूर केल्या जातील. प्रसंगी कायद्यामध्ये बदल करू. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी नगरसेविका उमा बनछोडे, श्रीकांत बनछोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
चौक़ट
व्हेंटिलेटरसाठी शिरोली नाक्यावर वाट पाहिली
केंद्र शासनाने कोरोनाच्या संकटात राज्य शासनाला सहकार्य केले नाही. व्हेंटिलेटर मिळतील या आशेने शिरोली नाक्यावर वाट पाहिली. मात्र, ती काही आली नाहीत. अखेर राज्य शासनाकडून ती आणल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. थेट पाईपलाईनच्या २५ विभागांच्या परवानगी बाकी होत्या. हे देण्याचे मोठेपण भाजपने राज्यात सत्ता असताना दाखवले नाही. महाविकास आघाडी आल्यानंतर सर्व परवानगी मिळविल्या, अशी टीका त्यांनी केली.
पालकमंत्री म्हणाले...
दोन महिन्यांत शहरासाठी ४७ कोटींचा निधी
शहरात १४ ठिकाणी सिग्नल बसवून वाहतुकीची कोंडी फोडणार
सीपीआरमध्ये ४५० ऑक्सिजन बेड, ४७ हजार रेमडेसीविरचे वाटप करणारे कोल्हापूर राज्यात पहिले
बजापराव माजगांवकर तालीम सुशोभीकरणासाठी ५ लाखांचा निधी
(फोटो मिळाला तर पाठवतो)