घरफाळा वसुली भांडवली मूल्यावर
By Admin | Published: March 27, 2016 10:13 PM2016-03-27T22:13:15+5:302016-03-28T00:07:56+5:30
--ग्रामपंचायतींना दिलासा : घटनेतील समानतेच्या कायद्यानुसार निर्णय
अतुल आंबी --इचलकरंजी --भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा वसुली करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमार्फत घरफाळा वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या निर्णयासाठी एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत वसुलीसाठी स्थगिती असल्याने वसुलीमध्ये थोडी दमछाक होताना दिसत आहे. मात्र, या निर्णयामुळे सर्वांना समानतेचा न्याय मिळाला असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
सन २००१ सालापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतींची घरफाळा वसुली भांडवली मूल्यावरच केली जात होती. मात्र, गावपातळीवरील गट-तट व राजकारण यामधून काही ठिकाणी अन्याय होत होता. त्यामुळे शासनाने २००१ पासून क्षेत्रफळावर आधारित घरफाळ्याची वसुली सुरू केली. यामध्ये घराच्या वर्गवारीनुसार ठरलेल्या दराला घराच्या क्षेत्रफळाने गुणाकार करून घरफाळा ठरविला जात होता. मात्र, जुनी घरे व नवीन घरे यासाठी क्षेत्रफळावर आधारित एकच दर लागू होऊ लागला. म्हणून डॉ. विजय शिंदे यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामध्ये घटनेच्या समानतेच्या कायद्याला या क्षेत्रफळानुसार वसुलीमुळे धक्का लागत असल्याचे नमूद केले.
त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन डिसेंबर २०१५ मध्ये न्यायालयाने भांडवली मूल्यावरच घरफाळा वसुली करण्याचा निर्णय शासनाला दिला. त्यानुसार २०१५-२०१६ ची घरफाळा वसुली भांडवली मूल्यावर सुरू झाली आहे. यामध्ये गावातील रेडिरेकनरचा दर (किमान मूल्य) त्याला भारांक १ (एक हजारच्या भागाने) नुसार भागाकार करून त्याला घराच्या वर्गवारीनुसार ठरलेल्या दराप्रमाणे गुणाकार करून त्यानुसार घरफाळा लागू होणार आहे. म्हणजेच दहा लाख रुपये किमतीच्या आरसीसी घराचा घरफाळा सुमारे १२०० रुपयेपर्यंत होईल. शासनाच्या या निर्णयामुळे जुन्या इमारतींना कमी, तर नवीन इमारतींना जादा असा घरफाळा लागू होणार आहे.