प्रस्ताव पुन्हा ‘हद्द’पार ?

By admin | Published: June 14, 2015 01:52 AM2015-06-14T01:52:01+5:302015-06-14T01:52:01+5:30

हद्दवाढ : मतैक्य घडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच; चंद्रकांतदादांनी हात झटकले

Proposal again reaches' border? | प्रस्ताव पुन्हा ‘हद्द’पार ?

प्रस्ताव पुन्हा ‘हद्द’पार ?

Next

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर महासभेच्या मान्यतेने सरकारकडे पाठविण्यात येत असला तरी, नव्याने सत्तेवर विराजमान झालेल्या राज्यकर्त्यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’ अशीच आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हद्दवाढीसंदर्भात एकमत करण्याची जबाबदारी ही मुख्यत: महानगरपालिकेची असल्याचे सांगत आपले अंग यातून काढून घेतले. त्यामुळेच या प्रस्तावाचे भवितव्यही अंधारातच आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शहराची रखडलेली हद्दवाढ करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आता सत्तेवर आल्यानंतर त्यांच्याही भूमिकेत बदल झालेला दिसत आहे. त्यामुळे हद्दवाढीचा प्रस्ताव पुन्हा एकदा हद्दपार होईल का, अशीच भीती निर्माण झाली आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात महानगरपालिकेने शहराची हद्दवाढ होऊन मिळावी म्हणून किमान पाच ते सहा वेळा प्रस्ताव पाठविले; परंतु सत्तेत असलेल्या कोल्हापूरच्याच नेत्यांनी या प्रस्तावास वेळोवेळी खो घातला. त्यामुळे त्यांच्या काळात हद्दवाढ झाली नाही. हा मुद्दा भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत उचलून धरला होता. आम्ही सत्तेत आल्यास शहराची हद्दवाढ करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी येथील जनतेला दिले होते. मात्र, त्यांनीही आता या विषयात भाग घेऊन जनतेचा रोष ओढवून घ्यायला नको म्हणून त्यापासून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते.
गावांची सहमती आवश्यक
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हद्दवाढीच्या प्रस्तावावर एकमत करण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच असल्याचे त्यांनी सांगितले. दादांच्या या भूमिकेतून सरकारला या वादात पडायची इच्छा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या गावांचा हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे, त्या गावांतील नागरिकांना हद्दवाढ दोघांच्याही फायद्याची कशी आहे, हे पालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी समजून सांगावी. त्यात जर गावांचं हित असेल तर ती गावे तयार होतील. हद्दवाढीला शंभर टक्के गावे तयार होतील असेही नाही; परंतु जास्तीत जास्त गावांची सहमती घेणे आवश्यक आहे. गावातील नागरिकांना शहरात जावे असे वाटले पाहिजे; म्हणूनच महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे पालकमंत्री म्हणाले.
स्वार्थासाठी हद्दवाढ लादू नका : महादेव महाडिक
शिरोली : महापालिकेच्या राजकारणात स्वत:च्या स्वार्थासाठी काही राजकीय नेतेमंडळी अन्यायी हद्दवाढ ग्रामीण भागातील जनतेवर लादत आहेत, पण हे कदापि शक्य होणार नाही. ग्रामीण भागातील जनता ही हद्दवाढ जनआंदोलन उभा करून उधळून लावेल. मी २० गावांच्या ग्रामीण भागातील जनतेबरोबर हद्दवाढीला विरोध करणार, असे आमदार महादेवराव महाडिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, शहरालगतची उपनगरे वाढली, पण या शहराचा विकास वाढला नाही. शहरातील कोणत्या भागात कोणत्या उपनगरांना चांगले रस्ते आहेत, ड्रेनेज सुविधा, कचरा प्रश्न, दूषित पाणी आदी प्रश्न प्रलंबितच आहेत. हद्दवाढ करून विकास फंड उपलब्ध करण्यासाठी शासनाकडेच निधी नाही, असेही आमदार महादेवराव महाडिक म्हणाले.
 

Web Title: Proposal again reaches' border?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.