‘आॅटो डीपर’ यंत्रणेसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव
By admin | Published: October 22, 2016 01:16 AM2016-10-22T01:16:31+5:302016-10-22T01:21:10+5:30
प्रसाद दळवी : रात्रीच्यावेळी होणारे अनेक अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनचा प्रयत्न
शोभना कांबळे -- रत्नागिरी --रात्रीच्यावेळी होणाऱ्या अनेक अपघातांना कारणीभूत ठरणारी ‘अप्पर हेडलाईट’ची समस्या दूर व्हावी म्हणून यापुढे वाहनांमध्ये ‘आॅटो डीपर’ यंत्रणा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे केंद्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहिती येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांनी दिली.चालकांनी सजगता दाखवली तर अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होते. यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन वाहनचालकांनी करणे गरजेचे असते. अनेकदा एखाद्याच्या चुकीमुळे दुसऱ्याचा हकनाक बळी जातो. वाहतुकीचे नियम पाळले जावेत, यासाठी परिवहन विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जावेत यासाठी काटेकोर दंडाची कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेटसक्ती ही या उपक्रमाचाच भाग आहे. अपघात झाल्यास चालकाला हेल्मेटमुळे जीवदान मिळाल्याच्या अनेक घटना आहेत.
त्याचबरोबर अपघात टाळण्यासाठी सध्या चारचाकी वाहनांची ‘फीटनेस तपासणी मोहीम’ सर्वत्र राबविली जात आहे. या मोहिमेत वाहनांचे टायर, इंजिन, योग्य कोनात असलेले आरसे, ब्रेक आदी बाह््य तपासणीबरोबरच अंतर्गत भागांचीही पाहणी केली जात आहे. याची पूर्तता करणाऱ्या वाहनांना ‘फिटनेस प्रमाणपत्र’ दिले जात आहे.
एकंदरीत प्रवास करताना तो अपघातविरहीत व्हावा, जीवितहानी होऊ नये, यासाठी परिवहन विभाग विविध नियमांचे पालन करण्यासाठी चालकांना उद्युक्त करतानाच विविध उपक्रमही राबवत आहे.
या विभागासमोर आत्तापर्यंत ठरलेली डोकेदुखी म्हणजे वाहनचालकांकडून योग्यवेळी डीपरचा होत नसलेला वापर. रात्रीच्यावेळी समोरील वाहनाच्या डोळ्यावर येणाऱ्या हेडलाईटमुळे समोरचा रस्ता न दिसल्याने अनेक गंभीर अपघात घडले आहेत. यात अनेकांचे बळीही गेले आहेत. काही वाहनांचे लाईट तर एवढे प्रखर असतात की, त्याचा त्रास समोरून येणाऱ्या वाहनांना होतो. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून यापुढे वाहनांची निर्मिती करतानाच त्याला ‘आॅटो डीपर यंत्रणा’ बसविण्यात यावी. विविध कंपन्यांना हे बंधनकारक असावे, यासाठी परिवहन विभागाकडून तसा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
डीपरचा वापर न केल्याने रात्रीच्यावेळी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या समस्येवर उपाययोजना म्हणून आता आॅटो डीपर यंत्रणा प्रत्येक उत्पादक कंपन्यांनी नव्या वाहनांमध्ये बसविल्यास अनेक अपघात टळण्यास मदत होणार आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीची सध्या परिवहन विभागाला प्रतीक्षा आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास रात्रीच्यावेळी होणाऱ्या बहुतांशी अपघातांना रोखणे शक्य होणार आहे.