अविनाश गायकवाड यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:28 AM2021-08-13T04:28:02+5:302021-08-13T04:28:02+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाहूवाडीचे उपअभियंता यांना पूरकाळात दांडी मारणे महागात पडले आहे. सेवानिवृत्तीला ...

Proposal for departmental inquiry of Avinash Gaikwad | अविनाश गायकवाड यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

अविनाश गायकवाड यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

Next

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाहूवाडीचे उपअभियंता यांना पूरकाळात दांडी मारणे महागात पडले आहे. सेवानिवृत्तीला दोन महिने उरले असताना त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली असताना गायकवाड हे पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर होते. खासदार धैर्यशील माने यांनी २५ जुलै रोजी शाहूवाडी येथे आढावा बैठक घेतली होती. या बैठकीलाही गायकवाड अनुपस्थित होते. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील रस्ते, इमारती यांचे नुकसान काय झाले, जे रस्ते वाहून गेले त्याची पर्यायी व्यवस्था याबाबत काहीच माहिती मिळू शकले नाही. माने यांनी याबाबत फोन करून नाराजी व्यक्त केल्यानंतर गायकवाड यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्यात आली.

यावर त्यांनी आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्याने दवाखान्यात असल्याचे म्हणणे दिले आहे. त्यांच्या जागी हातकणंगलेचे उपअभियंता एम. डी. क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. क्षीरसागर यांनी गेल्या १५ दिवसांत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन केले; परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता आपत्तीकाळात गैरहजर राहणाऱ्या गायकवाड यांची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

चौकट

पाठीशी घालण्याचे प्रयत्न

जर खासदार माने शाहूवाडीला बैठकीला गेले नसते तर गायकवाड कामावरच नाहीत हे कळलेच नसते. काही लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याशिवाय गायकवाड यांचे हे धाडस कसे झाले, अशी विचारणा आता होत आहे. खासदारांच्या बैठकीपर्यंत शाहूवाडीच्या लोकप्रतिनिधींना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना ते गैरहजर होते हे माहिती नव्हते का.. आणि माहिती होते तर त्यांनी कारवाईसाठी मागणी केली होती का, अशीही विचारणा होत आहे.

Web Title: Proposal for departmental inquiry of Avinash Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.