घोटवडे ग्रामपंचायत बरखास्तीचा प्रस्ताव
By Admin | Published: October 13, 2016 01:09 AM2016-10-13T01:09:01+5:302016-10-13T02:11:42+5:30
दोन हजारांचा एलईडी बल्ब पाच हजारांना : पर्यावरण निधी नियमबाह्यपणे खर्च
समीर देशपांडे --कोल्हापूर --दोन हजार रुपयांचा एलईडी बल्ब तब्बल पाच हजार रुपयांना दाखवून पैसे हडप करणे, १५ टक्के मागासवर्गीयांसाठीचा निधी खर्च न करणे आणि पर्यावरण निधी नियमबाह्य पद्धतीने खर्च करणे या कारणांस्तव पन्हाळा तालुक्यातील घोटवडे ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने तयार केला आहे.
याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांना सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार २७ सप्टेंबर आणि ३ आॅक्टोबरला सुनावणी घेण्यात आली असून, आता याबाबतचा अंतिम अहवाल पुन्हा विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.
घोटवडे ग्रामपंचायतीने जून २०१५ मध्ये वीज बिल कमी होण्यासाठी गावामध्ये एलईडी बल्ब बसविले. हे काम निवास पाटील यांनी आपल्या भक्ती स्ट्रीट लाईट एनर्जी एजन्सी, जेऊर या संस्थेतर्फे घेतले होते; परंतु हे बल्ब निकृष्ट असल्याची तक्रार ग्रामस्थ विजय दिवाण यांनी केली होती. त्यांनी एक दिवसाचे उपोषणही केले होते. या प्रकरणी आमदार हसन मुश्रीफ यांनी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन ग्रामसेवकांची वेतनवाढही रोखण्यात आली.
याबाबत चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या प्रकल्प कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १९ सप्टेंबर रोजी गावामध्ये जाऊन तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. हा चौकशी अहवाल ग्रामपंचायत विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
ही एलईडी दिव्यांची तक्रार आल्यानंतर आणि विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने आणखी खोलात जाऊन या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केली असता मागासवर्गीयांचा निधी खर्च न करणे तसेच पर्यावरण निधी नियमबाह्ण पद्धतीने खर्च केल्याची बाब उघडकीस आली. या सर्व बेकायदेशीर कारभाराची दखल घेत ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत संबंधित सरपंच आणि सदस्यांचेही म्हणणे नोंदवून घेण्यात आले आहे. एकूणच या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने खंबीर भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दोन ग्रामसेवकांची चौकशी सुरू
एकूणच, घोटवडे ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केल्यानंतर ज्या तीन ग्रामसेवकांच्या कालावधीत हा गैरकारभार झाला आहे, त्यांतील एकाची वेतनवाढ रोखण्यात आली असून, दोन ग्रामसेवकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चौकशी अहवालातील मुद्दे
सार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक तांत्रिक मंजुरी घेतली नाही.
स्लॅँग कंपनीचा एक बल्ब २०१८ रुपयांना असून त्याची किंमत पाच हजार लावण्यात आली आहे.
हे बल्ब चायना मेड असून ते टिकाऊ नाहीत.
हायपॉवर बल्ब बसविणे बंधनकारक असताना कमी क्षमतेचे बल्ब बसविले आहेत.
टेंडरमध्ये जोडलेली कोटेशन्स एकाच माणसाने वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर भरली असून, उर्वरित कंपन्यांनी आपण टेंडर भरले नसून, आपल्या लेटरपॅडचा गैरवापर केल्याचे पत्र दिले आहे.
४टेंडरमध्ये स्लॅँगचे बल्ब लिहिले असताना ३० पैकी पाच ठिकाणी दुसऱ्या कंपनीचे बल्ब बसविले असून, त्यांतील तीन बल्ब तपासणीवेळी बंद होते.