आदमापूर येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव
By admin | Published: November 23, 2014 11:00 PM2014-11-23T23:00:26+5:302014-11-23T23:45:05+5:30
या पुलाचा सुमारे ३० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालय स्तरावर
दत्ता लोकरे - सरवडे -महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आदी राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाजवळ राधानगरी-निपाणी महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा भाविकांना त्रास होत आहे. येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी उड्डाणपुलाचा प्रस्ताव शासन दरबारी होता. या तालुक्यातील असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना शिष्टमंडळ भेटले असून, येत्या हिवाळी अधिवेशनानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन मिळाले आहे. या पुलाचा सुमारे ३० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालय स्तरावर आहे.
राधानगरी-निपाणी तसेच व गारगोटी-कोल्हापूर या मार्गावर सध्या सुरू असलेली बऱ्याच कारखान्यांची ऊस वाहतूक बॉक्साईटची वाहतूक, बसेस व अन्य खासगी वाहतूक यामुळे नेहमीच मुधाळतिट्टा येथे वाहतुकीचा बोजवारा उडतो. दोन-दोन तास वाहनधारकांना गर्दीत थांबावे लागते. त्यामध्ये जवळ असलेले श्री क्षेत्र बाळूमामा भक्तांना वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. अमावास्या, दर रविवार, जयंती, पुण्यतिथी, वार्षिक भंडारा उत्सव, दिवाळी पाडवा उत्सव, अशा अनेक यात्रा या ठिकाणी भरतात. परराज्यांतून लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. याचा परिणाम येथून होणाऱ्या यंत्रणेवर होऊन कमालीची वाहतूक कोंडी होते.
राधानगरी-निपाणी मार्गावर असणाऱ्या या देवस्थानजवळील मार्गावरून बिद्री, शाहू, हमीदवाडा, आदी साखर कारखान्यांची होणारी ऊस वाहतूक मिणचे, दुर्गमानवाड येथून बेळगावकडे होणारी बॉक्साईटची वाहतूक, कर्नाटकातून कोकण व गोवा राज्यांकडे होणारी वाहतूक यामुळे रस्त्यावर नेहमीच गर्दी असते.
आदमापूरपासून जवळच मुधाळतिट्ट्याला राधानगरी, भुदरगड व कागल या तीन तालुक्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आदमापूर-मुधाळतिट्टा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल गरजेचा आहे. यासाठी सर्व्हेही करण्यात आला. मात्र, काही तांत्रिक अडचणी होत्या; परंतु पाटबंधारे प्रकल्प व सार्वजनिक बांधकाम खाते या दोन्ही बांधकाम खात्याच्या समन्वयातून लवकरच मार्ग काढला जाण्याची शक्यता असून, तालुक्यातील असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घातले आहे. याप्रश्नी येत्या ंिहवाळी अधिवेशनात चर्चा घडवून याकामी निधीची तरतूद केली जाणार असल्याचे समजते. अनेक वर्षे वाहतुकीचा भेडसावणारा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.
30 कोेटी खर्च अपेक्षीत
कोल्हापूर जिल्हा कागल तालुका, देवगड तालुका सीमेपासून राधानगरी-मुधाळतिट्टा, निढोरी-निपाणी राज्य हद्दीपर्यंत, राज्यमार्ग १७८ कि.मी. ११५/९०० ते ११६ /२०० मध्ये फ्लायओव्हर पूल बांधणे.