शिवाजी विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पदांचा प्रस्ताव धूळखात; चंद्रकांतदादा आपले, तरीही विद्यापीठावर अन्याय का?
By पोपट केशव पवार | Published: January 2, 2024 01:53 PM2024-01-02T13:53:17+5:302024-01-02T13:54:38+5:30
वाढपी आपला असूनही ताट रिकामेच
पोपट पवार
कोल्हापूर : एकीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या सहायक प्राध्यापक भरतीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली असताना शिवाजी विद्यापीठाचा रिक्त ७२ पदांचा प्रस्ताव मात्र अद्यापही धूळखात पडला आहे. या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटीलकोल्हापूरचे असतानाही या पदांच्या भरतीला मान्यता का मिळत नाही? असा सवाल शिक्षणक्षेत्रातून विचारला जात आहे.
शिवाजी विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकांची १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ७२ पदांचे रोस्टर तयार करून तो प्रस्ताव विद्यापीठाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविला आहे; मात्र अद्याप या प्रस्तावाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिलेली नाही. विद्यापीठात २०१४ पासून पूर्णवेळ सहायक प्राध्यापक भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक विभागांत कंत्राटी प्राध्यापकांवर ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे.
विविध विभागांत पूर्णवेळ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. याचा अध्यापनावर परिणाम होत असून, शैक्षणिक दर्जा ढासळत आहे. उपलब्ध प्राध्यापकांवरही ताण येत असल्याचे चित्र आहे. पूर्णवेळ प्राध्यापक निवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापक भरती केली. सध्या १२५ हून अधिक कंत्राटी प्राध्यापक आहेत; मात्र पूर्णवेळ सहायक प्राध्यापक भरतीला कधी मुहूर्त लागणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
असे आहे विद्यापीठातील चित्र
मंजूर पदे- २६२, भरलेली पदे- १३७, रिक्त पदे- १२५, किती पदांना मान्यता मिळेल- ७२, विद्यापीठात कार्यरत कंत्राटी सहायक प्राध्यापक - १२५.
वाढपी आपला असूनही ताट रिकामेच
वाढपी आपला असला की थोडे अधिकचे मिळते, हा सार्वत्रिक अनुभव. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते आल्यानंतर शिवाजी विद्यापीठाला काही अधिकचे मिळेल, अशी अपेक्षा कोल्हापूरकरांनी ठेवली होती; मात्र विद्यापीठासमोरील प्रस्तावित भुयारी मार्गाला निधी देण्याव्यतिरिक्त एकही भरीव काम मंत्री पाटील यांच्या काळात झालेले नाही. राज्यातील शिवाजी विद्यापीठ वगळता सर्व अकृषी विद्यापीठांमधील भरतीला मान्यता मिळाली. काही विद्यापीठांमधील भरती प्रक्रिया पूर्णही झाली. मंत्री पाटील यांची ताकद कमी पडत आहे का? अशीही शंका उपस्थित होत आहे.
या विद्यापीठातील भरतीला मिळाली मान्यता
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ-अमरावती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ- छत्रपती संभाजीनगर, गोंडवाना विद्यापीठ-गडचिरोली, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-जळगाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ-नागपूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ-नांदेड.