नऊ नंबरची शाळा ‘मराठा भवन’साठी देण्याचा प्रस्ताव

By Admin | Published: June 10, 2015 12:09 AM2015-06-10T00:09:11+5:302015-06-10T00:27:59+5:30

महापालिकेतील बैठकीत मंजुरी : लवकरच स्थायी, महासभेची घेणार मंजुरी

Proposal for giving a nine-number school for 'Maratha Bhavan' | नऊ नंबरची शाळा ‘मराठा भवन’साठी देण्याचा प्रस्ताव

नऊ नंबरची शाळा ‘मराठा भवन’साठी देण्याचा प्रस्ताव

googlenewsNext

कोल्हापूर : शिवाजी महाराज व राजर्षी शाहूंच्या विचारांचे प्रतीक असलेल्या, बहुजनांचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मराठा भवन’साठी महापालिकेने जागा द्यावी, अशी मागणी विविध मराठा संघटनांनी मंगळवारी महापालिका बैठकीत केली. राजारामपुरीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा क्रमांक नऊचे मैदान ‘मराठा भवन’साठी योग्य असल्याचे मत स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी मांडले. याला सर्वच सदस्यांनी संमती दर्शविली. लवकरच या जागेला भेट देऊन स्थायी समिती व महासभेची मंजुरी घेण्याचे ठरले.
मराठा भवनसाठी शहरातील महापालिकेची जागा निश्चितीबाबत चर्चा करण्यासाठी स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. उपमहापौर मोहन गोंजारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिक्षण मंडळाचे सभापती संजय मोहिते, नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, नगररचना सहसंचालक डी. एस. खोत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदींसह विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सांगली, सातारा, रत्नागिरी, बंगलोर, आदी ठिकाणी मराठा भवन आहेत. बिहार राज्याने दिल्लीत केंद्रीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रशिक्षणार्थ केलेल्या भवनच्या धर्तीवर या मराठा भवनाचे कार्य चालणार आहे. पुढील १०० वर्षांचा विचार करून मराठा भवन हे जागतिक माहिती केंद्र ठरेल. मराठा भवनला आर्थिक मदत देण्यासाठी इतर समाजही आघाडीवर आहेत. कोल्हापुरातील मराठा भवन ‘बहुजन समाजाचे व्यासपीठ’ म्हणून ओळख निर्माण करील, असे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.
दिलीप देसाई यांनी राजारामपुरीतील जनता बझारची जागा मराठा भवनला देण्याची मागणी केली. संगीता नलवडे यांनी किमान सहा एकर जागा हवी, असे स्पष्ट केले. हिंदुराव हुजरे-पाटील यांनी मराठा भवन निर्मिती व जागेच्या आडवे येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी महादेव पाटील, राजू सावंत, बाबा महाडिक, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, नीता सूर्यवंशी, संपत चव्हाण, प्रवीण पाटील, प्रशांत बरगे, प्रताप साळोखे यांनी आपली मते मांडले. (प्रतिनिधी)

राजारामपुरीतील शाळेची जागा महापालिकेच्या मालकीची आहे. ही जागा मराठा भवनला देण्यास अडचण येणार नाही. यासाठी दोन दिवसांत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून सर्वानुमते सभागृहात या जागेवर शिक्कामोर्तब करू.
- आदिल फरास,
सभापती, स्थायी समिती

Web Title: Proposal for giving a nine-number school for 'Maratha Bhavan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.