शिरोळमध्ये पूरबाधित गावांत नौकांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 01:02 AM2019-08-24T01:02:34+5:302019-08-24T01:05:12+5:30
महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते.
संदीप बावचे।
शिरोळ : एनडीआरफ, लष्कर, नौदलाच्या पुढे जाऊन लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कामगिरी शिरोळ तालुक्यातील अनेक नावाड्यांनी बजावली. प्रामुख्याने आलास, कनवाड, गणेशवाडी, कवठेसार, खिद्रापूर या ठिकाणी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांना पैलतीरी पोहोचवून नावाड्यांनी जिगरबाज कामगिरी बजावली.
महापुराच्या आपत्तीनंतर गाव तिथं नाव हा प्रस्ताव आता पुढे आला आहे. सुमारे ४७ गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सुरुवातीला लाकडी नावेच्या साहाय्याने पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू होते. त्यानंतर सरकारी यंत्रणा आली. त्यामुळे आपत्ती काळात लाकडी नावांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे.
शंभर वर्षांतील सर्व रेकॉर्ड मोडून प्रलयकारी महापुराने शिरोळ तालुक्यात थैमान घातले. सन २००५ च्या महापुराची गणिते मांडणाऱ्या अनेक पूरग्रस्तांची गणिते चुकली. सुरुवातीला अनेक पूरग्रस्तांनी पै-पाहुणे, नातेवाईक यांच्याकडे आसरा घेतला. मात्र, ५ आॅगस्टनंतर पुराचे पाणी झपाट्याने वाढू लागल्यानंतर अनेक गावांचे मार्ग बंद झाले. त्यामुळे नावेतून स्थलांतर होण्याशिवाय पर्याय नव्हता. वाढणाºया पाण्याची धास्ती घेतलेले अनेकजण जिवाच्या आकांताने चिंताग्रस्त होते.
अशा संकटात पूरग्रस्तांसाठी स्थानिक नावाडी धावून आले. आलाससह कनवाड, गणेशवाडी, खिद्रापूर, कवठेसार, कोथळी, औरवाड येथील नावाड्यांनी अनेक पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. त्यानंतर लष्कर, नौदल, एनडीआरएफची पथके दाखल झाली. त्यांच्याबरोबरीनेच स्थानिक नावाड्यांनीदेखील जीव धोक्यात घालून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचविले.
महापुराच्या या आपत्तीनंतर ‘गाव तिथं नाव’ हा प्रस्ताव पुढे आला आहे. सन २००५ च्या महापुरात सुमारे ४० गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता, तर यंदाच्या महापुरात सुमारे ४७ गावे पूरबाधित झाली.
२००५ सालातील महापुरानंतर गाव तिथं नाव असा ठराव पंचायत समितीच्या सभेत करण्यात आला होता. त्यानंतर ४२ गावांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाकडी नौका आल्या होत्या. त्यानंतर कालांतराने ३६ गावांत लाकडी नौका राहिल्या. मात्र, महापुराच्या आपत्तीत तेरा गावांतीलच नौका सुस्थितीत असल्याची माहिती पुढे आली आहे. कनवाड, आलास, गणेशवाडी, कवठेसार, खिद्रापूर, राजापूर, नांदणी, धरणगुत्ती, कोथळी, उदगाव, औरवाड, नृसिंहवाडी, आदी गावांतील नौका चांगल्या स्थितीत असल्यामुळे त्याचा वापर झाला.
गाव तिथं नाव या माध्यमातून सुस्थितीत नौका सुरू ठेवण्याबरोबरच आपत्ती काळात अशा नौकांना यांत्रिकी मशीन बसवून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, असा प्रस्ताव पुढे आला आहे. क्षमतेपेक्षा जादा लोकांची वाहतूक लाकडी नौकांतून पूरकाळात करण्यात आली. मात्र, मर्यादित संख्याच नावेत असावी, हा मुद्दा पुढे आला आहे. लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास महापुराच्या काळात त्याचा निश्चित फायदा होणार आहे.
शासकीय यंत्रणेबरोबरच कामगिरी
अनेक जिगरबाज नावाड्यांनी महापूर काळात विनामोबदला सेवा बजावली. जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविणाºया नावाड्यांना मदतीचे हात आता पुढे आले आहेत. शासकीय यंत्रणेबरोबर त्यांनीही महापूर काळात चांगली सेवा बजावली. लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास शासनाच्या यंत्रणेची गरजच भासणार नाही. त्यामुळे शासन पातळीवर याबाबत कार्यवाही होणे तितकेच गरजेचे आहे.
लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास निश्चितच फायदा होणार आहे. अशा नौका चालविणाºया नावाड्यांना शासनाने कायमस्वरूपी मानधन द्यावे. शिवाय लाईफ जॅकेट याबरोबरच आपत्तीकाळातील सुविधा पुरवाव्यात.
- सदाशिव आंबी, नावाडी गणेशवाडी
महापूर काळात लाकडी नौका चालविणाऱ्यांनी पूरग्रस्तांना स्थलांतरित करून चांगले काम केले आहे. या लाकडी नौकांना यांत्रिकी मशीन बसविल्यास आणखीन जलद काम त्यांना करता येईल. त्यासाठी शासनाकडे अशा नौकांना यांत्रिकी मशीन बसविण्याचा प्रस्ताव देणार आहोत. - समीर शिंगटे, प्रांताधिकारी