३९ सरकारी कार्यालयांसाठी नव्या इमारतीचा प्रस्ताव
By admin | Published: May 7, 2017 06:54 PM2017-05-07T18:54:32+5:302017-05-07T18:54:32+5:30
आराखडा तयार करण्याचे काम सुरू
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0७ : शहरातील ३९ सरकारी कार्यालयांसाठी नवी इमारत बांधण्याच्या कामाला गती आली असून या इमारतीचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शासनाची शहरातील ३९ कार्यालये सध्या विखुरलेल्या अवस्थेत भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. त्यासाठी महिन्याला ८ लाख ४१ हजार रुपये भाड्यापोटी दिले जातात. रंकाळ्यापासून ते ताराराणी चौकापर्यंत आणि कसबा बावड्यापासून ते उद्यमनगरापर्यंत सर्वत्र ही सरकारी कार्यालये विखुरलेली आहेत. ही सर्व कार्यालये एकत्र आणण्यासाठी आधीचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी एक नवीन प्रशासकीय भवन उभारण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. त्यानुसार आर्किटेक्टकडे आराखडा तयार करण्यासाठी हे काम देण्यात आले आहे.
विचारेमाळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची ४. ८२ एकर जागा आहे. १ लाख ६० हजार चौरस फूट जागा येथे बांधकामासाठी उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी ही इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. आराखडा तयार झाल्यानंतर त्याचे सादरीकरण होऊन मग याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
ही कार्यालये आहेत भाड्याच्या जागेत
सहकार विभागाचे विशेष लेखापरीक्षक कार्यालय, कृषि अधीक्षक अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, रेशीम विभाग, वनअधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, कौशल्य विकास अधिकारी, बाष्पके विभाग, दुय्यम निबंधक नोंदणी विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग यासारखी अनेक शासकीय कार्यालये सध्या भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत.