पुराने वेढलेल्या १३ गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 10:29 AM2019-08-30T10:29:35+5:302019-08-30T10:36:14+5:30
महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्रामस्थांनी गाव सोडण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : महापुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढले गेलेल्या जिल्ह्यातील १३ गावांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून या १३ गावांमध्ये गावसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेतले जात आहे; मात्र बहुतांशी ठिकाणी ग्रामस्थांनी गाव सोडण्याची मानसिकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील २४९ गावे सुरुवातीच्या टप्प्यात पूरबाधित होती. तो आकडा आता ३८६ वर गेला आहे. यामधील २७ गावांचा संपर्क तुटला होता, तर १३ हून अधिक गावे चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेली होती. या गावांची अवस्था इतकी बिकट झाली होती, की शेवटच्या टप्प्यात ग्रामस्थांना गावाबाहेर काढणेही जिकीरीचे बनले होते. काही ठिकाणी ग्रामस्थांनी जनावरे असल्याने बाहेर पडण्यास नकार दिल्यानंतर त्यांना जीवनावश्यक वस्तूही पोहोचविण्यात आल्या.
पूर ओसरल्यानंतर मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने हालचाली सुरू ठेवल्या आहेत. पूर कमी आला आहे, म्हणून निवांत न राहता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीने जिल्ह्यातील प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना आदेश काढून जिल्ह्यातील १३ गावांच्या पुनर्वसनासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.
या गावांमध्ये सन १९८९, २00५ आणि २0१९ मध्ये आलेल्या पुरात गावातील घरांमध्ये किती प्रमाणात पाणी जाऊन हानी झाली आहे, किती घरे पूर्ण, अंशत: पडलेली आहेत आणि किती राहण्यास योग्य नाहीत, याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून, गावामध्ये पुराने झालेली हानी त्याचप्रमाणे स्थलांतरित होण्याबाबतची तयारी विचारात घेऊन पुनर्वसन करण्याबाबत अहवाल द्यावा, तसेच संपूर्ण गाव स्थलांतरित होण्यासाठी तयार नसल्यास अतिपूरबाधित ठिकाणे किंवा विशिष्ट भागातील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी तयार आहेत का? याची पाहणी करण्याचे आदेश दौलत देसाई यांनी दिले आहेत.
या गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव
करवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे, तर शिरोळ तालुक्यातील टेकवाडी, खिद्रापूर, राजापूरवाडी, हसूर, राजापूर, अर्जुनवाड, कुटवाड, बस्तवाड, निलेवाडी, कनवाड.
ग्रामस्थांचा संपूर्ण स्थलांतरास विरोध
ज्या गावांमध्ये पिढ्यान्पिढ्या गेल्या, ते गाव जमीन जुमला सोडून जाण्यासाठी मात्र ग्रामस्थ तयार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी गावसभांमध्ये स्थलांतरासाठी विरोधही होत आहे. शासन देणार एक-दीड गुंठा जागा. आम्ही घर, जनावरे एवढ्यात कशी बांधायची असेही ग्रामस्थांचे काही मुद्दे आहेत. वर्षानुवर्षे नांदणारे घर सोडून पूरकाळातील आठ-१0 दिवसांसाठी परक्या ठिकाणी पुन्हा नवी सुरुवात करण्याची ग्रामस्थांची मानसिकता नसल्याचे स्पष्ट होत आहे.
महापुरामुळे पूर्णपणे वेढल्या गेलेल्या गावांच्या स्थलांतराबाबत ग्रामस्थांची मते जाणून घेतली जात आहेत. या ग्रामस्थांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याची शासनाची भूमिका आहे; परंतु त्यासाठी त्यांची कितपत तयारी आहे, याचाही विचार होण्याची गरज आहे. म्हणूनच माझ्या विभागाचे अधिकारी गावोगावी गावसभा घेत आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढच्या प्रक्रियेची दिशा ठरवली जाईल.
दौलत देसाई
जिल्हाधिकारी, कोल्हापूर