राधानगरी धरण जलविद्युत निर्मिती केंद्राच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार
By admin | Published: December 13, 2015 01:25 AM2015-12-13T01:25:58+5:302015-12-13T01:25:58+5:30
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांन आदेश
राधानगरी : राधानगरी धरणस्थळावरील ऐतिहासिक जलविद्युत निर्मिती केंद्राच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले असून, या केंद्रासह छत्रपती शाहूंचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. येथील शाहूप्रेमी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. यासाठी नागपूर येथे शिष्टमंडळाने मंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे.
शाहू महाराजांनी उभारलेल्या राधानगरी धरणावर पुढच्या विस्तारात राज्यातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले. साठ वर्षांपूर्वी याची उभारणी झाली, तेव्हापासून ते कार्यरत आहे. काळाच्या ओघात या केंद्राच्या देखभालीकडे पुरेसे लक्ष न दिल्याने काही जनित्र बंद आहेत. येथेच खासगीकरणातून दुसरे व अद्ययावत जलविद्युत निर्मिती केंद्र झाल्यावर जुन्या केंद्राकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आवश्यक पाण्याचा विसर्ग होण्यासाठी बंधने आली आहेत.
या धरण व केंद्राच्या रूपाने शाहू महाराजांचे जिवंत स्मारकच उभे असल्याने त्याचे जतन योग्य रीतीने व्हावे, यासाठी शाहूप्रेमी संघटना कार्यरत आहे. यासाठीच नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची भेट घेण्यात आली. धरणाचा समावेश हेरिटेज वास्तू म्हणून करावा, धरणावरील स्वयंचलित दरवाज्याची रचना बदलू नये. जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या शाहू स्मारकासाठी जागेची उपलब्धता करावी, असे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, संभाजी आरडे, राजेंद्र चव्हाण, सुनील बडदारे, बाळासाहेब कळमकर, महेश तिरवडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)