घरफाळा वाढीचा प्रस्ताव फेटाळणार

By Admin | Published: February 19, 2016 01:03 AM2016-02-19T01:03:12+5:302016-02-19T01:03:22+5:30

महापालिकेची उद्या सभा : शिवसेना आक्रमक; महासभेवर काढणार लाटणे मोर्चा; प्रस्ताव मंजूर झाल्यास सोमवारी कोल्हापूर बंद

The proposal to revive housing prices will be rejected | घरफाळा वाढीचा प्रस्ताव फेटाळणार

घरफाळा वाढीचा प्रस्ताव फेटाळणार

googlenewsNext


कोल्हापूर : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा उद्या, शनिवारी होत असून, या सभेत घरफाळा वाढीच्या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. जनतेतून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव फेटाळण्याचा सर्वच नगरसेवकांनी निर्णय घेतला आहे. याचबरोबर स्वीकृ त नगरसेवक म्हणून सुनील कदम यांच्या निवडीचा प्रस्तावही पुन्हा फेटाळला जाणार आहे. घरफाळावाढीला तीव्र विरोध करण्यासाठी महासभेवेळी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर लाटणे मोर्चा काढण्यात येणार आहे, तर प्रस्ताव उद्याच्या (शनिवार) महासभेत मंजूर करून घेतल्यास त्या निषेधार्थ सोमवारी (दि. २२) शिवसेनेने ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली आहे.



तर सोमवारी ‘कोल्हापूर बंद’
शिवसेनेचा इशारा : महापालिका चौकात निदर्शने; रेडिरेकनर’ रद्दचे आवाहन
कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने घरफाळा वाढीचा प्रस्ताव उद्याच्या (शनिवार) महासभेत मंजूर करून घेतल्यास त्या निषेधार्थ सोमवारी (दि. २२) ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने आयुक्त पी. शिवशंकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला. प्रस्तावित घरफाळा वाढीला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी सकाळी महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
भांडवली मूल्यावर आधारित (रेडीरेकनर) घरफाळा वाढीचा प्रस्ताव उद्या, शनिवारच्या महासभेत प्रशासनाने ठेवला आहे. महासभेने जरी या प्रस्तावाला विरोध दाखवून तो नामंजूर केला तरी आयुक्तांना तो मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे ही रेडिरेकनर पद्धतीने होणारी घरफाळा आकारणी रद्द करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन पुकारले असून, याबाबत गुरुवारी शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका चौकात निदर्शने केली. त्यानंतर ‘अन्यायी घरफाळा देणार नाही’ अशा घोषणा देत सर्व शिवसैनिक आयुक्तांच्या दालनापर्यंत गेले. तेथे सर्वांनी सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी शहरप्रमुख शिवाजीराव जाधव आणि दुर्गेश लिंग्रस यांनी भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा पद्धत रद्द होत नाही तोपर्यंत नागरिकांनी घरफाळा भरू नये, असे आवाहन केले.
शनिवारच्या महासभेत दुर्दैवाने घरफाळा वाढीला मंजुरी मिळाल्यास सोमवारी (दि. २२) ‘कोल्हापूर बंद’ करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांनी, ही भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा पद्धतीस विरोध दर्शवीत ती रद्द करण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले, दत्ताजी टिपुगडे, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, माजी उपमहापौर उदय पोवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शुभांगी साळोखे, कमलाकर जगदाळे, सुजित चव्हाण, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, फारुक मुल्ला, योगेश शिंदे, उपशहरप्रमुख राजेंद्र पाटील, शशी बिडकर, आदी उपस्थित होते.


घरफाळावाढीचा डाव हाणून पाडणार : क्षीरसागर
कोल्हापूर : महापालिकेचा भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा वाढीचा डाव शिवसेना हाणून पाडेल. उद्या, शनिवारी घरफाळावाढीला तीव्र विरोध करण्यासाठी महासभेवेळी शिवसेनेच्या वतीने महापालिकेवर लाटणे मोर्चा काढण्यात येणार असून, घरफाळा वाढीचा प्रस्ताव मागे घेत नाही तोपर्यंत महापालिकेस घेराव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
क्षीरसागर म्हणाले, यापूर्वी २०१० व २०१२ या दोन वेळा शिवसेनेच्या वतीने वाढीव घरफाळाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. कोणताही प्रयोग प्रथम कोल्हापूर शहरावर केला जात असल्याने, हा भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा वाढीचा प्रयोगही संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम कोल्हापूरवरच केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनात शिवसेनेच्या चार नगरसेवकांसह जनताही आपल्याबरोबर सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या शनिवार पेठेतील शहर कार्यालयापासून सकाळी १०.३० वाजता या लाटणे मोर्चाला सुरुवात होणार असून, महापालिकेसमोर मोर्चा येऊन तेथे निदर्शने करण्यात येणार आहेत त्यानंतर महापालिकेस घेराव घालण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या मालकीच्या शहरात सुमारे दहा हजार कोटींहून अधिक मूल्य असणाऱ्या मालमत्ता आहेत. त्यातून भरघोस उत्पन्न मिळू शकते; पण घरफाळ्याच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करून उत्पन्नवाढ केली जात आहे. या वाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस नगरसेवक राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले, अ‍ॅड. पद्माकर कापसे, आदी उपस्थित होते.

Web Title: The proposal to revive housing prices will be rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.