वार्षिक परीक्षांसाठीचा प्रस्ताव देणार, विद्यापीठ विकास मंचची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:29 AM2019-04-25T11:29:05+5:302019-04-25T11:31:44+5:30
शिवाजी विद्यापीठातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणे, विकासाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे; कला, वाणिज्य शाखांसाठी वार्षिक परीक्षा पद्धती असावी, आदी विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मंचची मागणी असल्याचे अधिसभा सदस्य पंकज मेहता, श्रीनिवास गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध घटकांचे प्रश्न सोडविणे, विकासाच्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ‘विद्यापीठ विकास मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचने आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठात तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे; कला, वाणिज्य शाखांसाठी वार्षिक परीक्षा पद्धती असावी, आदी विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. पदवी प्रमाणपत्रांची दुबार छपाई प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मंचची मागणी असल्याचे अधिसभा सदस्य पंकज मेहता, श्रीनिवास गायकवाड यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मेहता म्हणाले, विद्यापीठाचा शैक्षणिक, संशोधनात्मक विकास हे विद्यापीठ विकास मंचचे ध्येय आहे. त्यासाठी मंचने विविध रचनात्मक सूचना, ठराव विद्यापीठात सादर केले आहेत. पाठपुरावा केला आहे. त्यामध्ये खेळाडूंसाठी वैद्यकीय विमा सुविधा, मुलींच्या वसतिगृहात अद्ययावत सोयीसुविधा असाव्यात, सांगली व सातारा येथे विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, आदींचा समावेश आहे.
गायकवाड म्हणाले, दुबार प्रमाणपत्र छपाई प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला, तर मंच त्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. अधिसभा सदस्य दिनेश जंगम म्हणाले, प्राध्यापकांचे विविध प्रश्न आणि विद्यार्थ्यांसाठी छात्र संसद, खुल्या निवडणुका आगामी शैक्षणिक वर्षात घेण्यात याव्यात, अशी मागणी मंचने केली आहे. या पत्रकार परिषदेस अधिसभा सदस्य आरती शिंदे उपस्थित होत्या.
प्रस्तावासाठी समितीची स्थापना
विद्यापीठात कला, वाणिज्य शाखेसाठी पुन्हा वार्षिक परीक्षा पद्धती कशा पद्धतीने राबविता येईल; त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) कशी मान्यता घेता येईल, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंचने समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे. या समितीद्वारे प्रस्ताव तयार करून तो विद्यापीठाला सादर केला जाणार आहे. अन्य मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.