वाळू तस्करांविरुद्ध तडिपारीचे प्रस्ताव

By admin | Published: June 26, 2015 12:45 AM2015-06-26T00:45:50+5:302015-06-26T00:45:50+5:30

तासगाव प्रकरण : पाचजणांविरुद्ध गुन्हा; हल्लेखोर मोकाटच

Proposals for repatriation against sand smugglers | वाळू तस्करांविरुद्ध तडिपारीचे प्रस्ताव

वाळू तस्करांविरुद्ध तडिपारीचे प्रस्ताव

Next

सांगली / मिरज / तासगाव : तासगाव येथील नायब तहसीलदार व तलाठ्यांवर हल्ला करणाऱ्या पाच तस्करांविरुद्ध गुरुवारी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हल्ल्याच्या या घटनेला २४ तासांचा कालावधी होऊन गेला, तरी एकाही हल्लेखोरास पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, आतापर्यंत मिरज, तासगाव व कवठेमहांकाळ येथे महसूल अधिकाऱ्यांवर वाळू तस्करांकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व तस्करांची यादी करून त्यांच्याविरुद्ध तडिपारीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पोलिसांना दिले आहेत.
तासगावात बेकायदा वाळू वाहतूक रोखणाऱ्या निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, नायब तहसीलदार शेखर दळवी, तलाठी प्रमोद कोळी यांच्यावर बुधवारी दुपारी तस्करांनी वाळू हल्ला केला होता. याप्रकरणी अंकुश रामचंद्र देवर्डे, करण श्रीकांत कोळी, अनिकेत आप्पासाहेब गुरव (तिघे रा. तुंग, ता. मिरज), पवन मधुकर पाटील, प्रतीक दिलीपराव शिंदे (दोघे रा. दत्त वसाहत, आष्टा, ता. वाळवा) या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही घटना गंभीर असल्याचे सांगितले होते. तरीही पोलिसांनी जुजबी कलम लावून तस्करांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा आहे.
अवैध वाळू वाहतुकीला प्रतिबंध करताना महसूल अधिकाऱ्यांवर हल्ले व ताब्यात घेतलेले वाहन पळवून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मिरजेत महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले वाळूचे ट्रक परस्पर पळवून नेण्यात आले आहेत. वाळू तस्करांच्या कारवायांची प्रांताधिकाऱ्यांनी ( गंभीर दखल घेतली आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांकडून हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी वाळू तस्करीत गुंतलेल्या गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
हल्लेखोरांना सोडून दिले?
सर्व हल्लेखोर सांगलीच्या दिशेने आले होते. त्यांना सांगली-कवलापूर मार्गावर पोलिसांनी पकडले होते; मात्र त्यांना सोडून का दिले, अशी चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात सांगलीत पोलिसांकडे विचारणा केली असता, त्यांनी हे प्रकरण तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हल्लेखोरांना त्यांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले, तर तिकडे तासगाव पोलीस एकही हल्लेखोर पकडला नसल्याचे सांगतात. यावरून हल्लेखोरांना अभय दिले जात असल्याची चर्चा आहे.
पोलीस प्रमुखांकडून आढावा
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी तासगाव पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्याशी संपर्क साधून आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती घेतली. हल्लेखोरांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा का दाखल केला नाही? अशी विचारणाही केली. हे प्रकरण गंभीर असल्याने मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची त्यांनी सूचना केली आहे.
गॅस तस्कर हद्दपार
मिरजेत गॅसची अवैध विक्री करणाऱ्या अब्दुल फारुख बारगीर (शनिवार पेठ) सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. एक वर्षापूर्वी अब्दुल बारगीर हा हडको कॉलनीत वाहनात गॅस भरत असताना स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला होता, तर आठजण जखमी झाले होते. अवैध गॅस विक्रीबद्दल एकापेक्षा अधिक गुन्हे असल्याने मिरज पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांकडे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला
होता. (प्रतिनिधी)

तलाठी, कर्मचाऱ्यांचे आज लेखणीबंद
तासगावच्या नायब तहसीलदार आणि तलाठी यांच्यावर वाळू तस्करांनी अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ करण्याचा प्रकार बुधवारी घडाला. या घटनेच्या निषेधार्थ शुकवारी सांगली जिल्हा महसूल कर्मचारी संघटना आणि राज्य तलाठी संघाच्यावतीने एकदिवसाचे लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार सुधाकर भोसले यांना दिले. संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.

Web Title: Proposals for repatriation against sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.