मराठा तरुणांना लागू होणाऱ्या योजना प्रस्तावित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 12:15 PM2021-07-09T12:15:24+5:302021-07-09T12:17:10+5:30
Maratha Sarthi Kolhapur : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास, औद्योगिक वसाहत, कृषी आणि जिल्हा उद्योग केंद्राशी निगडीत कोण कोणत्या योजना लागू होतील, त्या योजनांचा लाभ तरुणांना कसा मिळू शकेल याबाबतच्या योजना प्रस्तावित करा, अशा सूचना सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी गुरुवारी केल्या.
कोल्हापूर : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास, औद्योगिक वसाहत, कृषी आणि जिल्हा उद्योग केंद्राशी निगडीत कोण कोणत्या योजना लागू होतील, त्या योजनांचा लाभ तरुणांना कसा मिळू शकेल याबाबतच्या योजना प्रस्तावित करा, अशा सूचना सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी गुरुवारी केल्या.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित या उपकेंद्राचा मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन योजना राबविण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, निबंधक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.
अशोक काकडे म्हणाले, सारथी संस्थेस ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार येथील मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासाकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने ज्या संस्था, घटकांकडून सूचना मिळाल्या आहेत त्यांचा विचार करून त्या अंमलात आणल्या जातील. पुण्यातील सारथी संस्था सुरू झाल्यापासून पहिल्या वर्षी एम.फीलच्या ५०२ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवाजी विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्यासह सारथीशी संलग्न संस्थांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा कौशल्य विकासचे सहायक संचालक संजय माळी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
असंतोष का हे समजून घ्या
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, मराठा समाजातील तरुणांची मुस्कटदाबी, अन्याय कोठे होत आहे, त्यांचे मागासलेपण, या मुलांमध्ये एवढा असंतोष का आहे हे शोधून त्यावर उपाययोजना करा. आपल्याला न्याय मिळत आहे असे त्याला वाटावे, असे काही करा. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राची व्याप्ती वाढवताना पदव्युत्तर, पीएच.डी., फेलोशिप सुरू करताना, विषय सुचवण्यासह लागेल ते सहकार्य करू.