वरदच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:19+5:302021-08-23T04:26:19+5:30
मुरगूड : सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या चिमुकल्याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याच्या मारेकऱ्यास लवकरात लवकर फाशीची ...
मुरगूड : सोनाळी येथील वरद रवींद्र पाटील या चिमुकल्याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याच्या मारेकऱ्यास लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली.
सोनाळी, ता. कागल येथे अभागी वरद पाटील कुटुंबीयांची घाटगे यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. रक्षाबंधन सणाच्या दिवशी मयत वरदची आई पूनम यांना त्यांनी बंधुप्रेमातून आधार दिला. नराधम मारेकऱ्यास फाशीची शिक्षा होईपर्यंत मी पाटील कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे, असा आधार दिला.
यावेळी अपत्य होत नसलेच्या नैराश्येतून नरबळीसारखा हा प्रकार असू शकतो, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा. या धक्क्यातून न सावरलेल्या वरदच्या कुटुंबीयांस पोलीस तपासासाठी बोलावित आहेत. या स्थितीस कुटुंबीयांची तशी मानसिकता नाही. त्यामुळे याबाबत पोलिसांशी आपण बोलावे असे साकडे ग्रामस्थांनी घाटगे यांना घातले. त्यांनी तात्काळ पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या तपासाला वेगळी दिशा न देता नागरिकांच्या म्हणण्यानुसार खरेच हा अंधश्रद्धेसारखा प्रकार असेल तर त्या दृष्टीने या प्रकरणाची चौकशी करावी व आरोपीस फाशीची शिक्षा देण्याच्या दृष्टीने तपास करावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी भूषण पाटील, प्रताप पाटील, सुखदेव चौगले, समाधान म्हातुगडे, प्रवीण खोळांबे, बाळासाहेब तापेकर, मधुकर भिऊगडे, दिग्विजय किल्लेदार उपस्थित होते.
फोटो ओळ
सोनाळी (ता. कागल) येथे मयत वरद पाटील या चिमुकल्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.