आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या, पृथ्वीराज चव्हाणांचा मांडी घालून रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 03:26 PM2018-08-05T15:26:29+5:302018-08-05T15:59:40+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज सकाळी परभणीच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली.
कोल्हापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही सुरूच आहे. आज सकाळी परभणीच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. त्यानंतर, कोल्हापूरच्या कणेरीवाडीतील विनायक परशुराम गुदगे या सकल मराठा कार्यकत्यानेही आपले जीवन संपवले. विनायकच्या आत्महत्येनंतर येथील दसरा चौकात संतप्त कार्यकत्यांनी रास्ता रोको केला आहे. या रास्ता रोको आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही चक्क रस्त्यावर मांडी घालून सहभाग नोंदवला.
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तर मराठा आंदोलकांच्या आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबेना, अशीच परिस्थिती दिसून येते. आज परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील अनंत लेवडे पाटील या तरुणाने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे, असे अनंतने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. अनंतने सकाळी 11 वाजता शेतात अंगावर राकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तर कोल्हापूरच्या कणेरवाडी येथील विनायक परशुराम गुदगे या तरुणानेही आत्महत्या केली. विनायक हा सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता होता. त्यामुळे विनायकच्या मृत्युनंतर येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दसरा चौकात रास्ता रोको सुरू केला आहे. विशेष म्हणजे या रास्ता रोकोमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, विनायकने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.
आत्महत्या केलेला विनायक परशुराम गुदगे (छायाचित्र)