समृद्ध शाळा अभियानामुळे शाळांचा चेहरा बदलेल : यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 02:32 PM2020-02-14T14:32:00+5:302020-02-14T14:49:52+5:30
कोल्हापू महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांच्या उन्नतीसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान’ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असून, त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी येथे बोलताना केले.
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांच्या उन्नतीसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान’ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असून, त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी येथे बोलताना केले. महापालिकेच्या शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यशाळा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
शहरात महापालिकेच्या एकूण ५९ शाळा कार्यरत असून, सेमी-इंग्लिश, डिजिटल क्लासरूम, बोलक्या भिंती, मॉडेल स्कूल, ज्ञानरचनावाद, संगणक प्रयोगशाळा ई-लर्निंग असे उपक्रम राबवून शाळांनी गुणवत्ता टिकविली आहे. तथापि, शाळा अधिक उन्नत व्हाव्यात या दृष्टिकोनातून हे अभियान राबविले जात आहे.
यासाठी शाळांचे पटसंख्येनुसार तीन गट करण्यात आले आहेत. शाळाशाळांमधून निकोप स्पर्धा निर्माण होऊन विद्यार्थी पटसंख्येबरोबरच भौतिक सुविधांची उपलब्धता, आनंददायी शिक्षण, नवोपक्रम, अध्ययन स्तरात वाढ करणे, समाज सहभागातून शैक्षणिक सुविधांची उपलब्धता करणे, इत्यादी बाबी शाळांनी राबवावयाच्या आहेत, असे यादव यांनी सांगितले.
अभियानाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये शाळांचे मूल्यांकन केले जाणार आहे. मूल्यांकनानुसार व पटसंख्येच्या निकषांनुसार शाळांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून समारंभपूर्वक त्यांना रोख बक्षीस व ट्रॉफी दिली जाणार आहे. प्रथम बक्षीस २० हजार, द्वितीय बक्षीस १५ हजार, तृतीय बक्षीस १० हजार व उत्तेजनार्थ पाच हजार इतके असणार आहे.
कार्यशाळेस ‘समग्र शिक्षा’चे कार्यक्रमाधिकारी रसूल पाटील, लेखापाल बाबा साळोखे, पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, उषा सरदेसाई, जगदीश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, सचिन पांडव, अजय गोसावी, संजय शिंदे, नीलेश सरनाईक, नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक उपस्थित होते.