कोल्हापुरात ‘वेलनेस स्पा’मध्ये वेश्या व्यवसाय, एकास अटक; हप्त्यासाठी माजी नगरसेवकाचा दबाव?
By उद्धव गोडसे | Published: June 25, 2024 04:03 PM2024-06-25T16:03:28+5:302024-06-25T16:03:46+5:30
छापा टाकून शाहूपुरी पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा
कोल्हापूर : शाहूपुरी येथील तिसऱ्या गल्लीत वेलनेस स्पामध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. स्पा चालक नागेश रमेश बेळन्नावर (वय ३२, मूळ रा. हिप्पगिरी विजापूर, ता. चडचण, जि. विजापूर) आणि जागा मालक दत्तात्रय गणपती शिंदे (रा. शाहूपुरी, ३ री गल्ली) या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेळन्नावर याला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. सोमवारी (दि. २४) रात्री आठच्या सुमारास कारवाई झाली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी वस्तीत स्पाच्या नावाखाली वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवारी रात्री छापा टाकून झडती घेतली असता, दोन पीडित महिला आढळल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, स्पा चालक बेळन्नावर याने पीडित महिलांचा गैरफायदा घेऊन वेश्या अड्डा चालवल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक बेळन्नावर याला अटक केली. स्पासाठी जागा देणारा मालक दत्तात्रय शिंदे याच्यावरही गुन्हा दाखल केला. बेळन्नावर याच्यावर यापूर्वीही अवैध मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई झाली आहे.
हप्त्यासाठी माजी नगरसेवकाचा दबाव?
वेलनेस स्पा सुरू ठेवण्यासाठी परिसरातील एका माजी नगरसेवकाने स्पा चालकावर दबाव टाकला होता. एका सामाजिक संघटनेमार्फत तो तक्रारी करीत होता, अशी प्राथमिक माहिती चौकशीत समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध व्यावसायिकांकडून खंडणी उकळणा-यांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.