‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 01:02 AM2016-11-17T01:02:01+5:302016-11-17T01:02:01+5:30
शनिवार पेठेत छापा : तिघांना अटक; सावंतवाडीतील दोन पीडित तरुणींची सुटका
कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत शनिवार पेठ पोस्ट कार्यालय परिसरातील इमारतीमध्ये ‘मसाज’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या हिना आयुर्वेदिक मसाज पार्लरवर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या पार्लरच्या महिला मालकीणसह दोघांना अटक केली.
शीतल दिग्विजय घाटगे (वय ३०, रा. महालक्ष्मी कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा), गिऱ्हाईक दयानंद महादेव कुंभार (३६, रा. कौलगे, ता. गडहिंग्लज), दिनेश अशोक पोवार (२८, रा. राजारामपुरी ५ वी गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी सावंतवाडी येथील
पीडित दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. पार्लरची दुसरी मालकीण आफ्रिन ऊर्फ हिना सय्यद (रा. इचलकरंजी) असून ती आजारी असल्याने सायंकाळी पाचच्या सुमारास इचलकरंजीला निघून गेली. त्यानंतर छापा पडल्याने ती मिळून आली. तिला रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
पोलिसांनी सांगितले, शनिवार पोस्ट कार्यालय परिसरातील एका जुन्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हिना आयुर्वेदिक मसाज पार्लर आहे. हे पार्लर आफ्रिन ऊर्फ हिना सय्यद व शीतल घाटगे या दोघी भागीदारीमध्ये चालवितात. सावंतवाडीतील तीन तरुणी कामाला आहेत. या पार्लरमध्ये जायचे असेल तर बोळातील अंधारातून चाचपडत जावे लागले. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पार्लरची कोणाला चाहूलही लागत नव्हती. याठिकाणी मसाजच्या नावाखाली राजरोज वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खबऱ्याने शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी दिली. त्यानुसार त्यांनी बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पथकासह पार्लरवर छापा टाकला असता कुंटणखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी शीतल घाटगे, गिऱ्हाईक दयानंद कुंभार, दिनेश पोवार यांच्यासह दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कबुली दिली. पोलिसांनी स्वत: फिर्याद देऊन अनैतिक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी या सावंतवाडी येथील असून त्यांची परिस्थिती गरिबीची आहे. यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दि. २४ आॅक्टोबरला दाभोळकर कॉर्नर परिसरातील मसाज सेंटरवर छापा टाकून अड्डा मालकीणीसह तिघांना अटक केली होती. शहरात शेकडोच्यावर मसाज सेंटर आहेत. त्यापैकी काही ठिकाणी राजरोस वेश्या व्यवसाय चालतो हे या कारवाईवरून निष्पन्न झाले आहे. (प्रतिनिधी)
अशी केली कारवाई
पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी एक बनावट गिऱ्हाईक खात्री करण्यासाठी पाठिवले. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ती व्यक्ती मजास पार्लरमध्ये गेली. त्याने स्पेशल मसाजची मागणी केली. अड्डा मालकीण शीतल घाटगे हिने त्याच्यासमोर २२ वर्षांच्या दोन तरुणी उभ्या केल्या. त्यातील त्याने एक पसंत केली. पार्लर तीन खोल्यांचे आहे. दोन खोल्यांमध्ये मसाज चालतो. आतील एका खोलीत गेल्यानंतर त्या व्यक्तीने मोबाईलवरून राणे यांना संदेश दिला. त्यानंतर काही वेळांतच छापा टाकला.
महिला होमगार्डची मुलगी
शीतल घाटगे हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने पोलिसांना आपली आई गृहरक्षक दलात नोकरीस आहे. मी तिच्याकडेच राहतो असे सांगितले. शीतल ही यापूर्वी राजारामपुरीत मसाज पार्लर चालवत होती. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद केल्याने तिने आपला मोर्चा मध्यवस्तीत वळविला. हिनाशी भागीदारी करून ती हा व्यवसाय चालविते.
पार्लरकडे ग्राहकांचा ओढा
शनिवार पोस्ट कार्यालय परिसरात शासकीय कार्यालये आहेत. याठिकाणी जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारासंबंधी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. मध्यवस्तीत असलेल्या या मसाज पार्लरकडे अनेक ग्राहकांचा ओढा होता. प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये घेतले जात होते. संशयित हिना सय्यद, शीतल घाटगे यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून त्या कोणा-कोणाच्या संपर्कात आहेत, त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे.