आयुक्तसाहेब धुळीपासून संरक्षण करा...: खराब रस्त्यांवरुन बिंदू चौकात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 04:03 PM2019-12-09T16:03:07+5:302019-12-09T16:05:28+5:30
कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने केली.
कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने केली.
मास्क घालून आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. गंगावेश येथे खड्ड्यांचा वाढदिवस करणे, शहर अभियंतावर गुन्हे दाखल करणे आणि महापालिकेच्या महासभेला वाहनासह घेराव घालण्यात येणार असल्याचे वाहनधारक संघाने इशारा दिला आहे.
शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने जनआंदोलन सुरु केले आहे. खड्ड्यांचे लग्न, महारास्ता रोको आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने १५ दिवसांत पॅचवर्क करु, अशी ग्वाही दिली होती. अद्यापही रस्ते करण्यात आले नसल्यामुळे पुन्हा वाहनधारक महासंघाने आंदोलनाचे सुरु केला आहे.
वाहनधारक महासंघ आणि वि.स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बिंदू चौकात अभिनव आंदोलन केले. ‘मुक्त करा, मुक्त करा’, ‘आयुक्त साहेब धुळीपासून मुक्त करा’, ‘स्वच्छ हवा आमच्या हक्काची’, ‘खोटरड्या महापालिकेचा धिक्कार’असो अशा घोषणा दिल्या. यावेळी वाहनधारक महासंघाचे अभिषेक देवणे, विजय गायकवाड, पोपट रेडकर, पुष्पक पाटील, दिनमंहमद शेख, रोशन माने, ओंकार ओतारी, भास्कर भोसले, योगेश श्ािंदे यांच्यासह वि.स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी मास्क घालूनच आंदोलनात
शाहूपुरी, व्यापारी पेठ येथील वि.स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी धुळीमुळे त्रास होत असल्यावरुन वाहनधारक महासंघाच्या आंदेलनात सहभाग घेतला. स्वच्छ हवेच्या मागणीसाठी मास्क लावूनच विद्यार्थी आले होते. ‘आयुक्त साहेब धुळीपासून सरंक्षण द्या’, ‘मोकळी हवा आमचा अधिकार आहे’ असे घेतलेले फलक लक्षवेधी ठरले.