५० हजारांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण

By admin | Published: March 7, 2016 01:10 AM2016-03-07T01:10:16+5:302016-03-07T01:15:34+5:30

चंद्रकांतदादा पाटील : अडचणीतील नागरी बँकांना सॉफ्ट लोन देण्याचा विचार

Protection of deposits upto 50 thousand rupees | ५० हजारांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण

५० हजारांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण

Next

कोल्हापूर : सहकारी बँकांतील पाच लाख व पतसंस्थांमधीलही ५० हजारांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून अडचणीतील नागरी बँकांना सॉफ्ट लोन देण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
वीरशैव को-आॅप. बँकेच्या मोबाईल बॅँकिंग सेवा प्रारंभ, पॉस मशीनद्वारे व्यवहार व वेबसाईटचे अनावरण रविवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.
वीरशैव बॅँकेच्या प्रगतीचे कौतुक करत मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील ६५० नागरी बँकांपैकी फार कमी बँका सुस्थितीत आहेत. केवळ राजकारणासाठी सुरू केलेल्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चुकीचा कारभार करणाऱ्या संस्थांवर कारवाई व चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारण्याचे धोरण सरकारने घेतले आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे, तरीही ग्रामीण भागातील नागरी बँकांनी सामान्य माणसाला उभे करण्याचे काम केल्याने अडचणीतील नागरी बॅँकांना सॉफ्टलोनच्या माध्यमातून मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची सुरुवात रूपी बॅँकेपासून करत आहे. वीरशैव बॅँकेने पूर्णत: व्यावसायिकता स्वीकारत असताना व्यवसायात केलेली वाढ निश्चितच कौतुकास्पद असून इतर बँकांना आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार मंत्री पाटील यांनी काढले.
सामान्य ग्राहक केंद्रबिंदू मानून वीरशैव बँकेने सुरू केलेली वाटचाल आधुनिकतेकडे जात आहे. बॅँकेचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे महापौर अश्विनी रामाणे यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल नागराळे यांनी केले. बॅँकेच्या अध्यक्षा शकुंतला बनछोडे, संचालक गणपतराव पाटील, राजेश पाटील, सूर्यकांत पाटील, चंद्रकांत स्वामी, नानासाहेब नष्टे, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष महादेव साखरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


अमृतमहोत्सवाला मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्री
वीरशैव बॅँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना निमंत्रित करण्याची इच्छा संचालकांची आहे, मुख्यमंत्री तर निश्चित येतील, पंतप्रधान येतील की नाही हे सांगता येणार नाही पण केंद्रीय अर्थमंत्री किंवा अर्थराज्यमंत्र्यांना कोल्हापुरात आणू, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले.
कार्यक्रमातच दीड कोटीच्या ठेवी !
बॅँकेच्या ७५ व्या वर्षांत ७५ कोटींच्या ठेवी गोळा कराव्यात, अशी मागणी करत ईश्वरचंद्र दलवाई यांनी एक कोटी, तर सरलाताई पाटील ५० लाख रुपये ठेवीची घोषणा कार्यक्रमातच केली.

Web Title: Protection of deposits upto 50 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.