कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन
By भीमगोंड देसाई | Updated: February 20, 2025 14:41 IST2025-02-20T14:41:14+5:302025-02-20T14:41:56+5:30
कोल्हापूर - भिकारी सुद्धा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ...

कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन
कोल्हापूर - भिकारी सुद्धा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वीच केल होते. दरम्यान, ते आज शुक्रवारी कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी येत आहेत. त्यांनी कोल्हापुरात येण्याआधी शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पोवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिला.
पोवार म्हणाले, पीक विमा घोटाळा प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे लोक सामील आहेत. अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. महायुतीतील या सरकारमधील कृषीमंत्री शेतकऱ्यांना लाचार, भिकारी म्हणत आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्याला मदत करण्याऐवजी थट्टा केली जात आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री कोकाटे यांनी अजूनही शेतकऱ्यांची माफी मागितलेली नाही. ते आज, शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांना स्वाभिमानीच्या स्टाईलने हिसका दाखवण्यात येईल. पत्रकार परिषदेस धनाजी पाटील, डॉ. बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, सुनील सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी वीज थकबाकी भरू नये..
पोवार म्हणाले, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी साडेसात अश्चशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारकांना मोफत वीजचे घोषणा केली. तीन महिन्याचे वीज बिल शून्यही केले. शून्य बिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो होते. आता थकबाकीसह बिले आली आहेत. त्यावरील फोटो गायब आहेत. बिल भरमसाठी आली आहेत. मात्र कृषी पंपधारकांनी बिले भरू नये. बिले मागायला येणाऱ्यांना चांगला धडा शिकवा.