कोल्हापुरात शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:49+5:302021-08-25T04:30:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे आज, मंगळवारी शिवसैनिकांत संतप्त पडसाद उमटले. कोल्हापूर शहरासह तालुक्यांच्या ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा निषेध करताना त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. ठिकठिकाणी रास्ता राेकोही करण्यात आला. तावडे हॉटेल येथे जिल्हा युवा सेनेने महामार्ग रोको आंदोलन केले. त्याचवेळी नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपने निषेध केला.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे समजताच शिवसैनिकांनी आंदोलने सुरू केली. कोल्हापुरात शिवसेनेच्यावतीने राणे यांच्या निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला. येथे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संजय पवार व विजय देवणे यांनी आग्रह धरला. अखेर गुन्हा दाखल करून घेण्यात आला. दरम्यान, शहर शिवसेनेच्यावतीनेही शिवाजी चौकात राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून निषेध केला.
नारायण राणे यांच्या अटकेचा भाजपकडून निषेध
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत हुकूमशाही पद्धतीने अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने बिंदू चौक येथे मंगळवारी संध्याकाळी जोरदार निदर्शने करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक येथे एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.