हिरुगडे यांना कार्यमुक्त करण्यास विरोध
By admin | Published: February 4, 2015 11:45 PM2015-02-04T23:45:51+5:302015-02-04T23:58:26+5:30
राजेश क्षीरसागर यांचाही पाठिंबा : सीपीआर बचाव समिती आंदोलन शिवसेना करणार
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील एकमेव सर्जन असलेल्या व राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. शिवकुमार हिरुगडे यांना कार्यमुक्त करण्यास सीपीआर बचाव कृती समिती व आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कडाडून विरोध केला. चांगल्या डॉक्टरास घालवून जो विभाग चांगला सुरू आहे, त्याचेही वाटोळे करता काय, अशी विचारणा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांच्याकडे केली. डॉ. हिरुगडे यांची मंगळवारी तडकाफडकी पुण्याला बदली केली. डॉ. कोठुळे यांनी सायंकाळी त्यांना लगेच कार्यमुक्त केले. या जागेवर डॉ. कौस्तुभ मेंच यांना संधी देण्यासाठी महाविद्यालयाने ही तत्परता दाखवली. कागलच्या राजकीय नेत्यांचा त्यासाठी सीपीआर प्रशासनावर दबाव असल्याची चर्चा आहे. डॉ. कौस्तुभ मेंच हे जनरल सर्जन आहेत. राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या ‘असोसिएटेड प्रोफेसर’च्या परीक्षेतही ते अनुत्तीर्ण झाले आहेत व त्याच परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या हिरुगडे यांची बदली करून त्या जागेवर मेंच यांना संधी दिली जात आहे. ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि.४ फेब्रुवारी) त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यावर त्याची कृती समिती व आमदार क्षीरसागर यांनीही तातडीने दखल घेतली.समितीचे अध्यक्ष वसंत मुळीक यांनी डॉ. कोठुळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाहेरगावी होते. त्यामुळे ते आल्यावर त्यांना शिष्टमंडळासह भेटण्याचा निर्णय झाला. सीपीआरमध्ये सध्या बालरुग्ण व प्रसूतीशास्त्र हे दोनच विभाग चांगल्यारितीने सुरू आहेत. त्यामध्ये तुम्ही हिरुगडे याच रुग्णालयात हवेत, असा आग्रह शासनाकडे धरायला हवा होता, असे त्यांनी बजावले. आमदार क्षीरसागर यांनीही ‘लोकमत’ची बातमी थेट वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठवली. हिरुगडे यांना राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयातच ‘असोसिएटेड प्रोफेसर’ या पदावर संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. हिरुगडे यांच्या बदलीचा प्रयत्न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू, असा इशारा आमदारांनी कोठुळे यांना दिला.
डॉ. हिरुगडे यांचा सीपीआर रुग्णालयास नक्कीच चांगला उपयोग होतो, परंतु सध्या ते सहायक प्राध्यापक (शल्यचिकित्सा) या ‘क्लास-२’ च्या पदावर आहेत. त्यांची पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक (क्लास-१) म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. कार्यमुक्त करण्याचे शासनाचेच आदेश आहेत. तिथे रूजू व्हायचे की नाही हे त्यांनीच ठरवायचे आहे. याप्रकरणी प्रशासनावर कोणताही राजकीय दबाव नाही.
- डॉ. दशरथ कोठुळे, अधिष्ठाता, कोल्हापूर