निवेदन न स्वीकारल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:39+5:302021-08-14T04:29:39+5:30

कोल्हापूर : राज्य शासनाने परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भात काढलेल्या अध्यादेशाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळातील सदस्यांच्या गर्दीवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि ...

Protest of District Collector for not accepting the statement | निवेदन न स्वीकारल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध

निवेदन न स्वीकारल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध

Next

कोल्हापूर : राज्य शासनाने परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भात काढलेल्या अध्यादेशाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळातील सदस्यांच्या गर्दीवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी चांगलाच वाद झाला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले नाही तसेच वृत्तछायाचित्रकाराचा कॅमेरा काढून घेण्याचे आदेश दिल्याने त्यांचा निषेध करण्यात आला व निवेदन दालनाबाहेर चिकटवण्यात आले. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या परिचारिकांच्या बदल्यांच्या आदेशाबाबत निवेदन देण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी रेखावार यांना भेटायला गेले होते. दालनात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाच कार्यकर्तेच थांबा असे सांगितले. वृत्तपत्र छायाचित्रकारास कुणी परवानगी दिली, त्यांचा कॅमेरा जप्त करण्याची सूचना पोलिसांना केला. त्यावर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अन्य पक्ष, संघटना, शासकीय बैठका यामध्ये आपल्या दालनात गर्दी चालते तर विरोधी पक्षाला वेगळा न्याय का ? असा प्रश्न केला व जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत दालनाबाहेर आले. तोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी दालनाबाहेर आले. यावेळी सदस्य विषय मांडताना जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह धरल्याने पुन्हा वाद झाला व ते निवेदन न स्वीकारता परत दालनात गेले. यानंतर शिष्टमंडळाने हे निवेदन दालनाबाहेर चिकटवून त्यांचा निषेध केला. यावेळी सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, विजय आगरवाल, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, गायत्री राऊत, अजित ठाणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

--

जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारुन शिष्टमंडळाचा अपमान केला. इतर पक्षाचे निवेदन, बैठका, छायाचित्र त्यांना कशी चालते? अशी हुकुमशाही त्यांना कोणी करायला सांगितली.

महेश जाधव

प्रदेश कार्यकारिणी सदस्य

----

जिल्हाधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. निवेदन स्वीकारण्याऐवजी किती लोक आलात या विषयावरच ते ताठर राहिले. विरोधी पक्षाला अशा पद्धतीची चुकीची वागणूक का? या घटनेचा आम्ही निषेध करतो.

राहुल चिक्कोडे

जिल्हाध्यक्ष भाजप

---

फोटो नं १३०८२०२१-कोल-बीजेपी निवेदन

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व भाजप शिष्टमंडळात झालेल्या वादानंतर निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर चिकटवण्यात आली.

----

Web Title: Protest of District Collector for not accepting the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.