मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:24 PM2023-08-09T13:24:25+5:302023-08-09T13:44:27+5:30
सरकारवर दबाव आणूया : बाबा इंदूलकर, आंदोलनात सहभागी होण्याचा शिवाजी पेठेचा निर्धार
कोल्हापूर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या, ओबीसी यादीचे पुनर्निरीक्षण करा, ओबीसीचे फुगीर आरक्षण रद्द करा, या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज, बुधवार, दि. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खास बांधलेल्या भव्य मंडपात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदाेलनाविषयी कोल्हापुरात मोक्याच्या ठिकाणी भव्य फलक लागले आहेत.
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रतर्फे मराठा समाजाच्या सहा मागण्यांसाठी आज, बुधवारी मुंबईत आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून कोल्हापुरात धरणे आंदोलन होत आहे.
या आंदोलनाच्या तयारीसाठी उभा मारुती चौकात समितीने घेतलेल्या तयारीच्या बैठकीत ‘ज्याचे गाव, त्याचे नेतृत्व’, ‘ज्याचा विचार, त्याचा पुढाकार’, ‘लढा समाजाचा, जोश युवा तरुणाईचा’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या बैठकीत शिवाजी पेठेतील सर्व तालमी, तरुण मंडळे आणि संघटनांनी एकजुटीने या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार केला.
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, मराठ्यांना कोर्टात टिकणाऱ्या आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे, यासाठी कोल्हापुरातून नव्या क्रांतीला सुरुवात करायची आहे. पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा, याविषयी चर्चा करण्यासंदर्भात एकत्र यावे. सुजित चव्हाण, महेश जाधव, बाबा महाडिक, बाळ घाटगे, प्रा. मधुकर पाटील, अजित घाटगे, राजू सावंत, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, सुधा सरनाईक यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी माजी महापौर शोभा बोंद्रे, ॲड. अशोकराव साळोखे, बाबा पार्टे, तुकाराम इंगवले, सतीश खाडे, अनिल घाटगे, किरण माने, इंद्रजित बोंद्रे, रमाकांत आंग्रे, रणजित खराडे, विकास जाधव, किशोर घाटगे, प्रसन्न शिंदे, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या, तालमी, संघटना आणि तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.