सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय
By समीर देशपांडे | Published: December 7, 2022 06:05 PM2022-12-07T18:05:19+5:302022-12-07T18:05:47+5:30
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: जिल्हा नेहमीच सीमा वासियांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलेला आहे. सध्या केवळ राजकारणाचा भाग म्हणून मराठी माणसाची कळ काढली जात असून अशा प्रसंगी सीमा बांधवांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये शाहू समाधी परिसरामध्ये आंदोलन उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
येथील शासकीय विश्रामगृहावर आज बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वांनीच महाराष्ट्रातील भाजप शिंदे गटाच्या सरकारवर कडाडून टीका केली. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दल बदनामीचे वातावरण केले जात आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सीमा प्रश्नाचा हा मुद्दा जाणीवपूर्वक समोर आणण्याचा आरोप यावेळी नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर केला आहे.