कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी २३ मार्चला धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:08 IST2025-03-17T13:08:09+5:302025-03-17T13:08:21+5:30
हद्दवाढीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या धिक्काराच्या घोषणा

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी २३ मार्चला धरणे आंदोलन
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी येत्या रविवारी (दि. २३) छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सकाळी दहा वाजता आंदोलनाची सुरुवात होईल. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सर्वपक्षीय समितीने व्रजमूठ आवळली. माजी महापौर, उपमहापौर, आजी माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राजारामपुरीतील सूर्या कॉन्फरन्स सभागृहात रविवारी बैठक झाली.
स्थानिक आमदार आणि खासदार सोबत असल्याशिवाय हद्दवाढ शक्य नाही. त्यामुळे त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके यांच्यासह या तिन्ही मतदारसंघांत पराभूत झालेले उमेदवार ऋतुराज पाटील, राजू लाटकर आणि राहुल पाटील यांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्याचा निर्णय झाला.
हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, हद्दवाढीसंदर्भात यापूर्वी मोर्चे, उपोषण, आंदोलन झाले, मात्र सरकारला जाग नाही. हद्दवाढीचे निकष माहिती असूनही आमचा तालुका हद्दवाढीत घ्या, अशी मागणी काही नेते करतात. हद्दवाढीसाठी अनेक राजकीय नेत्यांनी फसविले आहे. आता मात्र कोल्हापूरची जनता गप्प बसणार नाही. हद्दवाढीसाठी जनता रस्त्यावर येणार आहे. हद्दवाढीसंदर्भात एक समिती स्थापन करावी. तसेच, हद्दवाढ होत नसेल, तर कोल्हापूरला नगरपालिका म्हणून घोषित करावे.
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, शिवाजी पुतळ्यासमोरील साखळी उपोषण हा पहिला टप्पा आहे. त्यापुढे महापालिकेसमोर आमरण उपोषण सुुरू केले जाईल. जोपर्यंत हद्दवाढीचे परिपत्रक सरकार काढत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.
माजी उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, हद्दवाढ करा नाहीतर कोल्हापूरला ग्रामपंचायत म्हणून जाहीर करा. निवडणूक होण्यापूर्वी वेगळी भूमिका आणि निवडणुकीनंतर वेगळी भूमिका राज्यकर्ते सोयीनुसार घेत आहेत. आता हा लढा जनता आपल्या हाती घेणार आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे व्ही. बी. पाटील म्हणाले, शहर आणि ग्रामीण अशी इर्ष्या करण्यापेक्षा हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांसोबत सुसंवाद साधावा.
ॲड. महादेवराव आडगुळे म्हणाले, हद्दवाढ झाल्याशिवाय केंद्र सरकारचा निधी मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरचा विकास थांबला आहे. माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, स्थानिक आमदार सोबत असल्यास हा प्रश्न एका महिन्यात मार्गी लागू शकतो. सन १९७२ पासून महापालिकेचे नेतृत्व बाहेरच्या मंडळींकडे राहिल्याने हद्दवाढीसाठी पुरेसे प्रयत्न झालेले नाहीत.
शिंदे सेनेचे सुजित चव्हाण यांनी हद्दवाढीला आमदार राजेश क्षीरसागर यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. पद्मजा तिवले यांनी केवळ हद्दवाढीच्या बैठकीसाठी आमदारांनी मंत्रालयांतील बैठकीत आवर्जून उपस्थित राहण्याची गरज आहे. के. पी. खोत म्हणाले, अधिवेशनानंतर हद्दवाढ प्रश्नी मुंबईत तातडीने बैठक घ्यावी.
या वेळी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, अनिल घाटगे, माजी नगरसेविका प्रार्थना समर्थ, माजी नगरसेवक अनिल कदम, कोल्हापूर चेंबरचे संजय शेटे, माजी महापौर राजू शिंगाडे, माजी महापौर विलास वास्कर, माया भंडारी, सुनील देसाई, आपचे उत्तम पाटील, मनसेचे राजू जाधव आदींची भाषणे झाली.