Kolhapur: बाळूमामा देवस्थानच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी धरणे आंदोलन
By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2024 15:54 IST2024-01-15T15:54:09+5:302024-01-15T15:54:51+5:30
कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजल्यापासून ...

Kolhapur: बाळूमामा देवस्थानच्या संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी धरणे आंदोलन
कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य सरकारीकरणाच्या विरोधात बुधवारी (दि.१७) सकाळी १० वाजल्यापासून गारगोटी येथील ज्योती चौकातून बाळुमामा देवस्थान संरक्षक धरणे आंदोलनास प्रारंभ होणार असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. देवस्थान बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात द्यावे अशीही मागणी सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिति आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने सोमवारी केली.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जिल्ह्यातील आदमापूरच्या संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करुन तेथे प्रशासक नेमले आहे. पण या प्रकरणाचे निमित्त करुन मंदिराचे सरकारीकरण करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्याचे सरकारीकरण न करता जे माजी विश्वस्त दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी पण देवस्थान भक्तांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी कृती समितीने केली आहे.
यापूर्वी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, तुळजाभवानीचे मंदिर, कोल्हापूरचे अंबाबाईचे मंदिर, मुंबईतील सिध्दिविनायक मंदिर, शिर्डीचे श्री साई संस्थानासह राज्यातील अनेक मंदिराचे सरकारीकरण झाले, पण त्या सरकारी समित्यांमध्ये भूमी, दागिने आणि अन्य अनेक गोष्टींमध्ये कोट्यावधीचे घोटाळे उघडकीस येत आहेत. जे सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करतात, त्यांच्याकडेच मंदिराची व्यवस्था देणे म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या देण्यासारखे आहे, म्हणून या सरकारीकरणाला विरोध असल्याचे समितीने म्हटले आहे.
यावेळी बाळूमामा हालसिध्दनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष निखिल मोहिते, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समितीचे समन्यवयक बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.