सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणारे आंदोलक एकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:27+5:302020-12-27T04:18:27+5:30
कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे आंदोलक अद्याप फरार ...
कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे आंदोलक अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणारे आंदोलक एकाकी पडले असून, नेत्यांनीही पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी पंचगंगा काठावरील कार्यकर्ते जागरूकपणे वारंवार आंदोलन करत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता काहीअंशी कमी होते. नदीकाठच्या लाखो नागरिकांच्या जीवन - मरणाचा प्रश्न असताना या प्रश्नाकडे राजकीय नेते सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.
गत आठवड्यात नदीपात्रात काळेकुट्ट रसायनयुक्त सांडपाणी आल्याने मासे मृत्युमुखी पडले होते. त्याची पाहणी करून पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड तेरवाड बंधाऱ्यावर आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे यांच्यासह पाचजणांनी क्षेत्र अधिकारी हरबड यांना काही काळ बांधून घालून त्यांच्या कारभाराचा निषेध केला होता.
त्यामुळे अधिकारी हरबड यांनी आंदोलकांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे नेते, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पाठ फिरविल्याने आंदोलक एकाकी पडले आहेत. किमान राजकीय नेत्यांनी आंदोलकांना पाठबळ देण्याची गरज आहे. अन्यथा कोणत्याही प्रश्नावरील आंदोलन आंदोलकांविना पोरके होईल.