विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षा मोठी हुकूमशाही : महादेवराव महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:27 AM2018-09-29T11:27:45+5:302018-09-29T11:29:25+5:30
‘राजाराम’ साखर कारखान्याचे अध्यक्ष हरिष चौगले व त्यांच्या पत्नी या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद आहेत. सैतवडे येथे जमीन नसतानाही त्यांना सभासद केले, अशांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये. विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षाही मोठी हुकूमशाही असल्याची टीका
कोल्हापूर : ‘राजाराम’ साखर कारखान्याचे अध्यक्ष हरिष चौगले व त्यांच्या पत्नी या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद आहेत. सैतवडे येथे जमीन नसतानाही त्यांना सभासद केले, अशांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये. विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षाही मोठी हुकूमशाही असल्याची टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली. ‘गोकुळ’ मध्ये रविवारी धर्मयुद्ध होणारच आहे.
‘राजाराम’ कारखान्याच्या सभेनंतर महाडिक पत्रकारांशी बोलत होते. महाडिक म्हणाले, ‘डी. वाय.’ कारखान्यात एका रात्रीत ४३०० सभासदांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, तेही खोट्या सह्या करून घरी घालविले. मार्केट कमिटीतील मोहन सालपेंच्या चाणक्यनितीतून हे घडले आहे. कदमवाडीतील हॉस्पिटल बंद पडले, भाड्याने माणसे आणून सरकारचे अनुदान घेतले जाते. आम्ही लोकशाही मानतो, त्यानुसारच आमची वाटचाल सुरू असून ‘गोकुळ’ची सभाही आम्ही लोकशाही पद्धतीनेच घेऊ. ‘गोकुळ’ मध्ये सध्या सत्य-असत्य आणि निती-अनितीचे धर्मयुद्ध सुरू आहे. मला खात्री आहे, विजय हा सत्याचा होणार आहे. बहुतांशी दूध संस्थांचा मल्टिस्टेटला पाठिंबा असल्याने कोणतीही अडचण नाही, असेही महाडिक यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर शिवाजीराव कदम, सुनील कदम, सत्यजित कदम, आदी उपस्थित होते.
अहवाल दाखविल्यास ५१ हजार
लोकशाहीची वल्गना करणाऱ्यांच्या कारखान्यात काय चालले आहे. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अहवाल दाखविणाºयांना ११ हजारांचे बक्षीस देतो, अशी घोषणा यापूर्वीच केली आहे; पण अद्याप कोणीही अहवाल दिलेला नाही. आता कोणीही अहवाल दिला, तर बावड्यात तो वाजत-गाजत आणून देणाºयास ५१ हजारांचे बक्षीस देऊ, असेही महाडिक यांनी सांगितले.
मल्टिस्टेटच्या बाजूने २७८० ठराव
मल्टिस्टेटला पाठिंबा देण्याबाबत आम्ही जिल्ह्यातील दूध संस्थांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन ३६०० पैकी २७८० संस्थांनी मल्टिस्टेटला पाठिंबा दिल्याने आम्हाला चिंता नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.