मराठा बांधवांवर लाठीहल्ला, कोल्हापुरात निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 11:26 AM2023-09-02T11:26:22+5:302023-09-02T11:28:43+5:30
'चळवळच मोडीत काढल्यास त्याची किंमत आगामी काळात मोजावी लागेल'
कोल्हापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध येथील शिवाजी चौकात शुक्रवारी रात्री सकल मराठा समाजातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. लवकरच बैठक घेऊन मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा काय असेल हे ठरवण्याचेही यावेळी जाहीर केले. लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यात २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे काही सहकाऱ्यांसोबत उपोषणाला बसले होते. त्यांच्यासह मराठा आंदोलकांवर पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद येथे उमटले. येथील शिवाजी चौकात मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी एकत्र येत निषेध नोंदवला.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदूलकर, रविकिरण इंगवले, विजय देवणे, सरदार पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, सरदार पाटील, प्रताप नाईक, विजय पाटील, मनजित माने, दीपक मुळीक, प्रतीक साळुंखे, प्रणव डाफळे, विराज पाटील, निल मुळीक, प्रसाद पाटील, महादेव जाधव, शाहीर डिलिओ सावंत, उदय लाड, सचिन जगदाळे, किशोर डवंग, अवधूत पाटील आदी सहभागी झाले होते.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजावर अमानुषपणे केलेला लाठीमार पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे. आता सत्तेत असणाऱ्यांची केंद्रातही सत्ता आहे. त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी लाठीमार केला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मराठा आंदोलकांना मारहाण करणाऱ्या सरकारला आगामी काळात समाज धडा शिकवेल. - संजय पवार, जिल्हाप्रमुख, कोल्हापूर
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक वर्ष भिजत असलेला प्रश्न न सोडवल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र होणे साहजिकच आहे. प्रश्न कौशल्याने हाताळण्याऐवजी लाठीमार करून चळवळच मोडीत काढल्यास त्याची किंमत आगामी काळात मोजावी लागेल. - राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कोणत्याही निशस्त्र आंदोलकांवर लाठीमार करणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. आपली वाटचाल हुकूमशाहीकडे नेत असल्याचे सरकार दाखवून देत आहे. सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच सोडवायचा नव्हता. सत्तेत नसताना देखील सत्ताधारी पक्षांनी या प्रश्नाचे फक्त राजकारणच केले. मराठा आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर दडपशाही करून आपले खरे रूप सरकारने दाखवून दिलेले आहे. याचा आम्ही निषेध करतो. - सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष