Kolhapur: मराठा आंदोलनाचे लोण जिल्हाभर; कुठं काय झालं...वाचा एका क्लिकवर
By संदीप आडनाईक | Published: October 31, 2023 06:18 PM2023-10-31T18:18:47+5:302023-10-31T18:20:09+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले तीन दिवस सुरु असलेल्या आंदोलनाचे ...
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेले तीन दिवस सुरु असलेल्या आंदोलनाचे लोण मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात पसरले. कोल्हापूरात शिवसेनेच्या ठाकरे गटाने बोंब मारो आंदोलन केले तर जुना बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत अर्धनग्न आंदोलन केले. जिल्ह्यात शिरोळ येथे आंदोलकांनी एसटी फोडली तर कुरुंदवाड येथे मुंडन आंदोलन, गडहिंग्लज येथे मोटरसायकल रॅली आणि इचलकरंजी जवळील शहापूर येथे साखळी उपोषण करुन या आंदाेलनाची धार आंदोलकांनी वाढवली.
कोल्हापुरात दसरा चौकात मराठा आंदोलकांनी तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण केले. त्यांना भेटण्यासाठी आलेले शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्यासमोरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती प्रदक्षिणा घालत सरकारविरोधात बोंब मारो आंदोलन केले.
दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर सशस्त्र पोलिस बंदोबस्त तर नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयासमोरही सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजेंद्र तोरस्कर यांच्या बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकाळी संयुक्त जुना बुधवार पेठ, पंचगंगा विहार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीच्या पाण्यात उतरून अर्धनग्न आंदोलन केले.