सकल मराठा समाजाची दसरा चौकात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 07:48 PM2020-09-11T19:48:34+5:302020-09-11T19:49:58+5:30
राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणास स्थगिती आली आहे. मंत्रिगटाचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण हेच सर्वस्वी जबाबदार असल्यामुळे येथून पुढे त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा स्टाईलनेच उत्तर दिले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे. शुक्रवारी दुपारी दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करून समाजातील तरुणांनी राग व्यक्त केला.
हातात भगवे झेंड घेऊन शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर बैठक मारून या तरुणांनी आरक्षण आमच्या हक्काचे, राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असतानाही ॲड. कुंभकोणी हे संपूर्ण खटल्यादरम्यान एकदाही सुनावणीला हजर राहिले नाहीत.
हरिष साळवेंसारखे सीनियर कौन्सिल बदलून ज्यांची क्षमता नाही, असे वकील नेमले. यावरून हे सरकार मराठा समाज आणि आरक्षणप्रश्नी असंवेदनशील होते, हे दिसून येते. याला जबाबदार असणारे मंत्री अशोक चव्हाण यांचा समाज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे, असे यावेळी समन्वयक सचिन तोडकर यांनी सांगितले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, रवींद्र मुदगी, नितीन देसाई, स्वप्निल चव्हाण, विकी जाधव, शैलेश जाधव, राजेंद्र चव्हाण, स्वप्निल पार्टे, आकाश साळोखे, प्रमोद पाटील, नीलेश सुतार, समरजित तोडकर, शौनिका चव्हाण यांनी सहभाग घेतला.