पेन्शन फक्त शेतकरी, जवानांनाच द्या..इतरांची रद्द करा, सोशल मीडियातून एकमुखी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:44 PM2023-03-16T12:44:00+5:302023-03-16T12:44:27+5:30

सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया

Protests on social media against government employees strike for old pension scheme | पेन्शन फक्त शेतकरी, जवानांनाच द्या..इतरांची रद्द करा, सोशल मीडियातून एकमुखी मागणी 

संग्रहित छाया

googlenewsNext

कोल्हापूर : शेतकरी, जवानांना पेन्शन द्या, इतर सर्वांची रद्द करा, अशी एकमुखी मागणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी करीत असलेल्या संपाविरोधात सामान्य, मध्यमवर्गीय, बेरोजगार असे विविध घटक सोशल मीडियातून तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

जुनी पेन्शन हवी असेल तर पगारही जुनाच घ्या, नवीन कशाला.. ? पती, पत्नी सरकारी नोकर असताना स्वतंत्र घर भत्ता कसा घेता..? अशा प्रतिक्रिया आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपासंबंधीची सहानुभूती बहुतांशी घटकांमध्ये नसल्याचे समोर येत आहे.

सरकारी काम आणि सहा महिने थांब, पैसे द्या, काम करून घ्या, सामान्यांना जाणीवपूर्वक हेलपाटे मारायला लावणे अशा कार्यपद्धतीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल आस्था नसल्यानेच त्यांच्या संपाच्या विरोधात समाज माध्यमात ट्रेड चालवला जात आहे. संपाचे दिवस वाढत जातील तसे हा ट्रेंड व्यापक होत आहे. विरोधातील प्रतिक्रियाही वाढताना दिसत आहे.

याला प्रत्युत्तर देण्यासाठी संपातील काही कर्मचारी आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, आम्हाला का नाही, असा प्रश्न विचारत आहेत. गेल्या महिन्याची आमदारांची पगार स्लीपही व्हायरल केली आहे. पण सर्वसाधारणपणे संपाच्या विरोधातील प्रतिक्रिया अधिक आणि समर्थनात नगण्य, असे सध्याचे चित्र आहे.

सोशल मीडियातून काय व्यक्त होत आहे?

  • आठवड्यातून दोन आणि तीन दिवस तेही १२ वाजता कार्यालयामध्ये येऊन पैसे घेतल्याशिवाय काम न करणारे पेन्शनसाठी सकाळी लवकर उठून मोर्चात आले होते.
  • आमदार, खासदारांना मिळणारी पेन्शन बंद केली पाहिजे का?
  • पेन्शन नाही म्हणून संप करण्याऐवजी नोकरी सोडा, बेरोजगारांना संधी मिळेल.
  • पगार नवा हवा मग नवी पेन्शन का नको?
  • पगार, सुट्टीचा पगार, रजा, पेन्शन नाही म्हणून शेतकरी, कामगार, कष्टकरी संपावर जातो का?
  • संप मागे नाही घेतला तर सामान्य नागरिक रस्त्यावर उतरतील.
  • सरकारी अधिकारी, कर्मचारी भावाचे घर, त्यांच्या पत्नीच्या अंगावरील सोने आणि शेतकरी, कष्टकरी, मजुराची परिस्थिती यावरही भाष्य केले आहे.


चारचाकी वाहनांचे फोटो

सरकारी कर्मचारी पेन्शनसाठीच्या मोर्चाला येताना चारचाकी, अलिशान वाहनातून आले होते. त्यांच्या पार्किंग केलेल्या वाहनांचे फोटो सोशल मीडियावर टाकत गरीब कर्मचाऱ्यांची वाहने पहा, यांना पेन्शन हवी आहे, अशी उपरोधात्मक आशयाची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Web Title: Protests on social media against government employees strike for old pension scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.