‘प्रोटोकॉल’ सुरक्षेचा की नेत्यांच्या अपमानाचा?
By admin | Published: October 26, 2015 12:20 AM2015-10-26T00:20:57+5:302015-10-26T00:22:59+5:30
उजळाईवाडी विमानतळ : नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान वाद नित्याचेच; ठोस धोरण ठरविणे गरजेचे
कोल्हापूर : उजळाईवाडी विमानतळावर प्रवेश देताना पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणांवरून राजकीय नेत्यांना मिळणारी वागणूक खूपच वादग्रस्त ठरत असून त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनाही मोठ्या अपमानास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विमानतळावर नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान वादावादीचे प्रसंग नित्याचेच बनले आहेत. त्यात पोलीस अधिकारी अनेक नेत्यांना ओळखतच नसल्याने त्याचाही फटका या नेत्यांना बसत आहे.
रविवारी महापालिका निवडणुकीचा सुपर संडे असल्याने कोल्हापुरात जाहीर प्रचार सभांसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या नेत्यांच्या स्वागतास विमानतळावर दिवसभर गर्दी होती. सकाळी पावणेदहा वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामध्ये कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
सुरुवातीला सर्वच नेते विमानतळ इमारतीच्या मुख्य दरवाजासमोर उभे होते. मात्र, विमानाचे ‘लॅँडिंग’ झाल्यावर सर्वप्रथम महादेवराव महाडिक आत गेले. त्यांना दबकतच अडविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी कोण अडविणार? असा प्रश्न करताच पोलीस यंत्रणा हबकली. त्यांच्यापाठोपाठ अनेक नेतेमंडळी आत जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने गोंधळ उडाला. विमानतळात प्रवेश करताना अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांकडून ढकलण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील पडता पडता वाचले. त्यामुळे त्यांनी आत न जाताच लांबच राहणे पसंत केले. शेवटी महाडिकांनी त्यांना बाहेर येऊन पुन्हा आत नेले. पोलिसांकडून दिग्गज नेत्यांना होणारी अशी वागणूक पाहून जि. प.चे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाहेरच राहणे पसंत केले. दरम्यान, महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी दारात उभे राहून आपल्या निवडक कार्यकर्त्यांची नावे पुकारत त्यांना आत घेतले.
हा गोंधळ सुरू असतानाच सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या स्वागतास उपस्थित असलेल्या उजळाईवाडीच्या सरपंच कॉँग्रेसच्या कार्यकर्त्या स्मिता आंबवडे यांनी आत जाण्याची विनंती केली असता पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी त्यांना बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी जाधव यांना त्या या परिसरातील प्रथम नागरिक असल्याचे सांगून समजाविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी आम्ही शासनाचा पगार घेतोय, कोणाला आत सोडायचे तुम्ही आम्हाला शिकविण्याची गरज नाही, अशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे आंबवडे या घरी परत जाण्यास निघाल्या असता पुन्हा जाधव यांनी त्यांना बोलवून घेऊन आत नेले.
या साऱ्या प्रकारांमुळे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था व लोकप्रतिनिधींना दिली जाणारी वागणूक हा मुद्दा ऐरणीवर आला. विमानतळाची सुरक्षा महत्त्वाचीच आहे. यामध्ये कोणाचेच दुमत नाही, पण लोकप्रतिनिधींचे तसेच मान्यवरांचा सन्मान राखणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे भान राखणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली.
हे करता येईल?
मंत्र्यांचे दौरे हे पूर्वनियोजित असल्याने त्यांच्या स्वागतास येणाऱ्या स्थानिक नेत्यांची व मान्यवरांची यादी अगोदरच नोंदवून घेता येईल.
स्थानिक नेत्यांना व मान्यवरांना ओळखणारा एखादा पोलीस अधिकारी या ठिकाणी असणे आवश्यक आहे.
विमानतळात प्रवेशासाठी एकच धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. एक तर कोणालाच प्रवेश देऊ नये किंवा देणे अपरिहार्यच असल्यास अगोदरच मान्यवरांना पूर्ण तपासणी करून आत प्रवेश द्यावा.
पोलीस अधिकाऱ्यांनीही अडवणूक करताना किंवा बोलताना सौजन्याचे भान ठेवूनच वागणूक देणे गरजेचे आहे.
नेत्यांनीही विमानतळाच्या सुरक्षेस बाधा येईल व अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल सांभाळण्यात अडचण येईल असे वर्तन करु नये.