कोरोना रुग्णांसाठी लवकरच ५०० बेड उपलब्ध करा; संभाजीराजे यांचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:10 PM2020-08-19T14:10:42+5:302020-08-19T14:12:20+5:30
खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून लवकरच कोल्हापुरातील कोरोना रुग्णांसाठी ५०० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यांनीच ही माहिती दिली. ईएसआय रुग्णालयात ही व्यवस्था करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून लवकरच कोल्हापुरातील कोरोना रुग्णांसाठी ५०० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यांनीच ही माहिती दिली. ईएसआय रुग्णालयात ही व्यवस्था करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
कोल्हापुरातील कामगारांसाठी असलेल्या ईएसआय रुग्णालयामध्ये कोरोनासंबंधीच्या विविध सुविधा पुरविण्याकरिता केंद्रीय रोजगार आणि कामगार कल्याण मंत्री संतोष कुमार गंगवार यांची संभाजीराजे यांनी दिल्लीत भेट घेतली व खासदार निधीमधून २२ लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. त्यावर मंत्रिमहोदयांनी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, तातडीने पुढील निर्णय होतील असे त्यांनी सांगितले.
कामगारांसाठी असलेल्या या रुग्णालयात पायाभूत सुविधा असूनसुद्धा, ते कार्यान्वित नाही. सध्या तिथे बाह्यरुग्ण विभाग सुरू असून हे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी महापालिकेला हस्तांतरित केले आहे; परंतु पुरेसे मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या अभावामुळे इथे काहीच हालचाल नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन खासदार निधीतून २२ लाख निधी या कामी देण्याचे नियोजन केले आहे.
काही उपकरणांची कमतरता असली तरी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणांच्या खरेदीकरिता खासदार निधीमधून खर्च करण्यात यावा, तसे पत्रसुद्धा संभाजीराजे यांनी सुपूर्द केले.