शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा
By Admin | Published: April 15, 2015 09:11 PM2015-04-15T21:11:28+5:302015-04-15T23:55:04+5:30
शिवसेनेची मागणी : मुरगूड-वाघापूर पूलप्रश्नी आंदोलनाचा इशारा, बुधवारी वरिष्ठ अधिकारी देणार भेट
मुरगूड : कागल आणि भुदरगड तालुक्यांना जोडणाऱ्या वेदगंगा नदीवरील मुरगूड-वाघापूर पूल हा शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमिनी न देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शेतकऱ्यांना जमिनीबाबत प्रशासनाने विश्वासात घेतले नसल्याने नापसंती व्यक्त होत आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला द्यावा, अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन करेल, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे.अनेक वर्षांपासून या पुलाची मागणी शेतकऱ्यांतूनच होती. युद्धपातळीवर या पुलाची उभारणी झाली. पूर्णपणे पूल तयार झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा पुलावर जाऊन बांधकाम बंद पाडले होते.
यासंदर्भात जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. टी. पोवार यांना भेटून प्रकल्पग्रस्त लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला होता. दरम्यान, २२ एप्रिलला वरिष्ठ अधिकारी मुरगूड येथे येऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.
यावेळी संभाजीराव भोकरे, अशोक पाटील, हरीश यादव, शरद पाटील, वैभव मोरे, नितीन कांबळे, मयूर कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)