माणगावमधील नियोजित स्मारकास निधीची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:41+5:302021-03-08T04:22:41+5:30

कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक समता परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेली कामे निधीअभावी खोळंबली आहेत. चार वर्षांपूर्वीच्या ...

Provide funds for the planned memorial in Mangaon | माणगावमधील नियोजित स्मारकास निधीची तरतूद करा

माणगावमधील नियोजित स्मारकास निधीची तरतूद करा

googlenewsNext

कोल्हापूर : माणगाव (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक समता परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेली कामे निधीअभावी खोळंबली आहेत. चार वर्षांपूर्वीच्या मंजूर आराखड्यातील १६९ कोटींची रक्कम देऊन या कामांना वेग द्यावा, अशी मागणी माणगाव समता परिषद समितीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमध्ये भेट घेऊन केली. समता परिषदेचे संयोजक अनिल कांबळे व सम्राट गाेंधळी यांनी निवेदन देऊन अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीचा आणि सामाजिक क्रांतीचा साक्षीदार असलेल्या माणगावचा पर्यटन व ऐतिहासिकदृष्ट्या विकास करण्यासाठी म्हणून शताब्दी वर्ष डोळ्यासमोर आराखडा निश्चित केला. तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या सूचनेनुसार १६९ कोटींचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे कामांना सुरुवात झाली. २ कोटी ३८ लाखांच्या सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या निधीतून लंडन भवनची प्रतिकृती, स्वागत कमान, ऑडिटोरियम, ऐतिहासिक भेटीच्या इमारतीचे नूतनीकरण, अशी कामे करण्यात आली. त्यानंतर कोरोनामुळे निधी शासनाकडून थांबवण्यात आला. गेले वर्षभर ही कामे थांबली आहे, शिवाय शताब्दी सोहळाही रद्द करण्यात आला.

विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात बौद्ध समाजाने दिलेेल्या साडेचार एकर जागेत विविध कामे होणार होती. यात अतिग्रे तलावाजवळ सांची स्तुपाच्या धर्तीवर कमान, माणगावमधील तलावावर संविधानाची प्रतिकृती, शाहू महाराज व आंबेडकर यांच्या भेटीचा साेहळा दर्शवणारे दीडशे फूट उंचीचे पुतळे, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, खुले सभागृह, बौद्ध केंद्र अशी विविध विकासकामे होणार होती, पण निधीच नसल्याने त्यांचा नारळच फुटू शकलेला नाही. हा निधी या अर्थसंकल्पात विशेष बाब म्हणून मंजूर करून दिल्यासदुसऱ्या टप्प्यातील कामांना गती येेणार आहे, हे अनिल कांबळे यांनी निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी अर्थमंत्री व उपमुख्यमंंत्री अजित पवार यांना या बाबतीत सांगण्याची ग्वाही दिली.

फोटो: ०७०३२०२१-कोल-माणगाव

फोटो ओळ: माणगाव समता परिषद समितीचे अनिल कांबळे, सम्राट गाेंधळी यांच्यासह शिष्टमंडळाने रविवारी कागलमध्ये जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे माणगाव स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

Web Title: Provide funds for the planned memorial in Mangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.